पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ‘या’ मसाल्यांचा आणि हर्ब्सचा आहारात करा समावेश

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता वाढते, तसेच अधूनमधून तीव्र सूर्यप्रकाश येत असतो. यामुळे हंगामी आजार डोकं वर काढण्यास सुरूवात करतात. अशावेळेस काही विशिष्ट मसाले आणि हर्ब्सचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे वारंवार होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणते आणि हर्ब्सचा आहारात समावेश करावा ते जाणून घेऊयात.

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी या मसाल्यांचा आणि हर्ब्सचा आहारात करा समावेश
| Edited By: | Updated on: Jun 16, 2026 | 4:12 PM

पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या आहारात काही बदल करणे खूप आवश्यक आहे. कारण वातावरणातील अचानक बदलामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. अशातच काही दिवसातच पावसाची सुरूवात होणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे जीवाणूंची वाढ होते. त्यातच तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर तुम्ही आजारी पडू शकता. या पावसाळी ऋतूमध्ये आरोग्यदायी हंगामी पदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला संसर्गामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांशी लढण्याची शक्ती मिळते. तर आपलया प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असे काही मसाले आणि विशिष्ट हर्ब्स आहेत जे जेवण बनवताना वापरले जातात, ज्या प्रतिकारशक्ती वाढवतात.

मसाले आणि हर्ब्स भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. आयुर्वेदानुसार त्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात तुम्ही यापैकी काही मसाले आणि हर्ब्सचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल. चला तर मग आजच्या लेखात या खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हळद स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात मूलभूत मसाल्यांपैकी एक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा एक उत्कृष्ट घटक आहे. पबमेडनुसार हळदीमधील कर्क्यूमिन मॅक्रोफेजेस, डेंड्रिटिक पेशी आणि बी व टी पेशींसोबत मिळून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. शिवाय, यात ॲंटी-इंफ्लामेटरी हे अस एक घटक आहे ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत होते. तुम्ही सकाळी कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा घेऊन पाण्यात उकळवून ते पाणी पिऊ शकता. पचनक्रिया चांगली असल्यास दुधामध्ये हळद मिक्स करून सेवन केली जाऊ शकते.

काळी मिरी देखील फायदेशीर आहे

पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात काळ्या मिरीचा समावेश करू शकता. काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचा घटक असतो, जो फुफ्फुसे निरोगी ठेवण्यास मदत करतो. हेल्थलाइननुसार त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तसेच त्यात दाहशामक गुणधर्मही आहेत. काळी मिरी हळदीसोबत खावी. हंगामी संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी हे एक उत्तम मिश्रण आहे.

तुळशीच्या पानांचे सेवन लाभदायक

हर्ब्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुळस ही एक वनस्पती आहे जी बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध असते. ही एक पॉवरफूल औषधी वनस्पती मानली जाते. तुळस केवळ रोगप्रतिकारशक्तीच वाढवत नाही, तर खोकला, घसादुखी, सर्दी आणि इतर सामान्य आजारांपासून आराम मिळण्यासही मदत करते. पावसाळ्यात विषाणूजन्य समस्या टाळण्यासाठी किंवा त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीचा चहा किंवा काढा पिऊ शकता.

लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवेल

पावसाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा. हेल्थलाइननुसार लसणामध्ये अशी संयुगे असतात जी प्रतिकारशक्ती वाढवतात आणि फ्लू निर्माण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत करतात. विशेषतः अख्ख्या लसणामध्ये ‘अलीन’ नावाचे एक संयुग असते, जेव्हा हा लसून बरीक चिरून चाऊन खाल्यावर ‘अलिसिन’मध्ये रूपांतरित होते. तसेच लसणातील जैव-सक्रिय संयुगांपैकी 80 टक्क्यांपर्यंत असते. तुम्ही दररोज सकाळी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या चावू शकता.

पावसाळ्यातील आहार

पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे तुमच्या आहारात सहज पचणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. बाहेरचे अन्न खाणे टाळावे, कारण अस्वच्छता आणि हवामानातील उष्णता व आर्द्रतेमुळे जिवाणूंची झपाट्याने वाढ होऊ शकते, ज्यामुळे आजारपण येऊ शकते. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा, पण हे सर्व पदार्थ पूर्णपणे धुतल्यानंतरच खावेत हे लक्षात ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us