तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की, भेसळयुक्त? ‘या’ 5 चाचण्या घरीच करा आणि ओळखा भेसळयुक्त दूध

लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींना डॉक्टर कायम दूध पिण्याचा सल्ला देत असतात. एवढंच नाही तर, गरोदर स्त्रीयांच्या आरोग्यासाठी दूध महत्त्वाची भूमिका बजावतं. पण तुम्ही पित अलेलं दूध शुद्ध आहे की, भेसळयुक्त तुम्हाला माहिती आहे का? आता भेसळयुक्त दूधाची ओळख तुम्हाला घरीच पटेल..

तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की, भेसळयुक्त? या 5 चाचण्या घरीच करा आणि ओळखा भेसळयुक्त दूध
| Updated on: Jul 16, 2026 | 2:59 PM

बाजारात आज दुधाचे अनेक ब्रँड्स आहेत. शिवाय अनेक जण डेअरीमधील दुधाला प्राधान्य देतात. सांगायचं झालं तर, आजच्या घडीला दूध आरोग्यासाठी फार मोठी भूमिका बाजवात आहे… दूध हे एक महत्त्वाचं पोषक तत्व मानलं जातं, विशेषतः मुलांच्या वाढीसाठी आणि शक्तीसाठी. पण, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या एका सर्वेक्षणामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल चिंता निर्माण करण्यात येत आहे. जेव्हा देशाच्या विविध भागांतून गोळा केलेल्या दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली गेली, तेव्हा जवळपास 70 टक्के नमुने गुणवत्ता मानकांमध्ये अयशस्वी ठरले. काही नमुन्यांमध्ये पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया आणि कृत्रिम घटकांसारखे भेसळयुक्त पदार्थ आढळून आले.

भेसळयुक्त दुधाच्या सततच्या सेवनाने दुधाचे पौष्टिक मूल्य तर कमी होतेच, पण त्यामुळे पचनाच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडांवर होणारे परिणाम, तसेच मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे चढ-उतार यांसारख्या आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. पण, तुम्ही घरीच काही सोप्या चाचण्या करून तुम्ही पीत असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त, हे ओळखू शकता.

दुधातील सर्वात सामान्य भेसळ म्हणजे त्यात मिसळलेलं पाणी… हे ओळखण्यासाठी, काच किंवा फरशीसारख्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब ठेवा. जर ते शुद्ध दूध असेल, तर थेंब फारसा न हलता एकाच जागी राहील. जर त्यात पाणी मिसळलेलं असेल, तर तो थेंब लगेच घसरून जाईल. तसेच, त्याच्या मागे दुधाचा कोणताही दृश्यमान अंश दिसणार नाही.

काही लोक दुधाचे आकारमान आणि घट्टपणा वाढवण्यासाठी त्यात स्टार्च मिसळतात. हे तपासण्यासाठी, एका ग्लासात थोडे दूध घ्या आणि त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. जर दुधाचा रंग निळा झाला, तर याचा अर्थ त्यात स्टार्च मिसळलेला आहे. जर रंग बदलला नाही, तर दूध शुद्ध मानलं जाऊ शकतं.

दूध अधिक पांढरं आणि घट्ट दिसावं म्हणून त्यात कधीकधी डिटर्जंट किंवा वॉशिंग पावडर मिसळली जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे ओळखण्यासाठी, एका ग्लासात 5 ते 10 मिलीलीटर दूध घ्या. तेवढंच पाणी घालून चांगले हलवा. जर वरती दाट फेस तयार होऊन तो बराच वेळ टिकून राहत असेल, तर त्यात डिटर्जंट मिसळलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध दुधात तयार होणारे बुडबुडे थोड्या वेळात नाहीसे होतात.

कृत्रिम दूध कसे ओळखावे?

रसायने, साबण आणि चुना यांसारख्या घटकांपासून बनवलेले कृत्रिम दूध आरोग्यासाठी धोकादायक असते. ते तीन प्रकारे ओळखता येते. दूध किंचित गरम करा. शुद्ध दुधाला नैसर्गिक गोड वास असतो. कृत्रिम दुधाला साबण किंवा डिटर्जंटसारखा तीव्र वास येतो. कृत्रिम दूध प्यायल्यावर किंचित कडू किंवा साबणासारखे लागतं. कृत्रिम दूध उकळल्यावर नेहमीपेक्षा जास्त घट्ट दिसू शकतं किंवा त्याचा रंग फिकट पिवळा होऊ शकतो. त्यामुळे दूध पिताना आणि विकरत घेताना विचार करा.

Follow Us