
प्रयागराजच्या भूमीत महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभमध्ये साधू, संत आणि बाबांनी हजेरी लावली आहे. अनेक प्रकारचे बाबा या महाकुंभात आले आहेत. त्यातील काही रुद्राक्ष बाबा आहेत. काही सायकलवरून आले आहेत. कुणाच्या डोक्यावर कबुतर आहे, कुणाच्या डोक्यावर शिवशंकराची भव्य प्रतिमा आहे. एक बाबा तर आयआयटी बाबा आहे. दुसरा एमटेक बाबा आहे. आता तर कुंभमध्ये आणखी एक बाबा अवतरला आहे. डॉक्टर बाबा म्हणून हा बाबा फेमस आहे. टच करून आपण लोकांना बरे करत असल्याचा दावा या बाबाने केला आहे. एवढेच नव्हे तर हवं तर माझ्यावर रिसर्च करा, असं आव्हानच या बाबाने दिलं आहे.
बाबा आर्तत्राण असं या बाबाचं नाव आहे. उडीसा येथील भुवनेश्वरचा तो रहिवासी आहे. महानिर्वाणी अखाड्याबाहेर बाबांचा कॅम्प असलेल्या ठिकाणी श्रद्धाळूंची मोठी गर्दी जमली आहे. देवाचा आशीर्वाद आणि मंत्रांची शक्ती वापरून असाध्य रोगांचा उपचार करू शकतात, असा दावाच या आर्तत्राण बाबाने केला आहे.
2011 पासून आपण “डिवाइन ट्रीटमेंट” देत आहोत आणि आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांचा उपचार केला आहे. फक्त भारतातच नाही, तर विदेशातही आपली दैवी शक्ती वापरून लोकांचे रोग बरे केले आहेत. आपल्या मंत्रांमुळे लहान रोगांपासून ते गंभीर रोगांपर्यंत उपचार होऊ शकतात, असं या बाबाचं म्हणणं आहे.
याबाबाने मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी हा दावा केला आहे. मेडिकल सायन्स न वापरता, लोक 120 वर्षांपर्यंत जिवंत होते. माझ्यावर संशोधन होणं आवश्यक आहे, कारण मी अशा रोगांचा उपचार करतो जो मेडिकल सायन्सच्या नियंत्रणात येत नाही, असंही या बाबाने म्हटलं आहे.
महाकुंभमध्ये आलेले भाविक बाबांना भेटतात आणि आपले आजार त्यांना सांगतात. बाबाही आधी रुग्णांना आजार काय आहे हे विचारतात. त्यानंतर रुग्णाच्या पोटावर हात ठेवून किंवा शरीराच्या इतर भागांवर हात ठेवून उपचार करतात. बाबांच्या उपचारामुळे लगेच आराम मिळत असल्याचा दावा या भाविकांनी केला आहे.
बाबा आर्तत्राण यांच्या कॅम्पवर श्रद्धाळूंच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोशल मिडियावर देखील बाबांच्या चमत्कारी शक्तींची चर्चा सुरू आहे. अनेक लोक बाबांच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन त्यांच्या उपचार पद्धतींचा अनुभव घेत आहेत.