व्होडका पिऊन ती झोपली पण उठल्यावर बघितलं तर काय ? थेट रुग्णालयातच पोहोचली

एक महिला रात्रभर एकाच स्थितीत पायांवर दाब देऊन झोपून राहिली, पण त्यामुळे तिची सकाळ थेट रुग्णालयातच उजाडली.

व्होडका पिऊन ती झोपली पण उठल्यावर बघितलं तर काय ? थेट रुग्णालयातच पोहोचली
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 27, 2023 | 8:23 AM

टोरांटो : मित्र-मैत्रिणींना भेटून पोटभर गप्पा मारायला कोणाला आवडत नाही ? अशीच एक कॅनेडियन महिला मित्रांसोबत नाईट आऊट (night out with friends)करून घरी आली. पण त्यानंतर तिची स्थिती गंभीर झाली. खरंतर, टोरांटो येथील एक महिला तिच्या मित्रांसोबत नाईट आऊटला गेली होती. यादरम्यान तिने भरपूर व्होडका (vodka) प्यायली. घरी आल्यानंतर ती गाढ झोपून गेली. पण सकाळी जाग आल्यावर तिची अवस्था पाहून ती थक्क झाली. तिच्या पायाचा आकार दुप्पट झाल्याने तिला सकाळी तातडीने रुग्णालयात (hospital) दाखल करावे लागले.

अनेक एक्स-रे आणि चाचण्या केल्यांनंतर तिला ‘कंपार्टमेंट सिंड्रोम’ असल्याचे आढळून आले. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंच्या ऊतींमध्ये दबाव वाढतो. ती महिला रात्रभर एकाच स्थितीत पायांवर दाब देऊन झोपून राहिली होती. त्यामुळे तेथील रक्तप्रवाह थांबला आणि पायही सुन्न पडला. शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, स्नायू आणि मज्जातंतूंच्या पेशींना दुखापत होऊ लागते, ज्यामुळे शरीराचा प्रभावित भाग कुजू लागतो.

जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केले ऑपरेशन

टोरंटोमधील मायकेल गॅरॉन रुग्णालयात निष्णात सर्जन्सनी महिलेचा जीव वाचवण्यासाठी तातडीने ऑपरेशन केले. त्यामध्ये डॉक्टरांनी त्या महिलेचा डावा पाय कापला. सूज कमी करण्यासाठी आणि विषारी पदार्थ रक्तप्रवाहात जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी स्नायू कापले. ऑपरेशननंतर, पायाचा खालचा भाग ठीक करण्यासाठी सर्जन्सनी महिलेच्या मांडीची त्वचा काढून टाकली आणि त्याचे पायाजवळ प्रत्यारोपण केले. ऑपरेशननंतर जवळपास पाच आठवड्यांनंतर महिलेल रुग्णालयातून सोडण्यात आले. आणि तिला आणखी तीन आठवडे बेड रेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. महिलेला एक वर्षासाठी हेवी पेनकिलर घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. ही घटना म्हणजे लोकांनी दारू पिऊन लगेच झोपणे टाळावे याचाच एक इशारा आहे.

कंपार्टमेंट सिंड्रोमची लक्षणे

1) स्नायूंना सूज येणे

2) खूप हलकं वाटणं

3) चालण्या-फिरण्यास त्रास होणे

4) स्नायू सुन्न होणे आणि अतिशय थकवा जाणवणे

5) हाता-पायाला सुया टोचल्यासारखे वाटणे

6) स्नायूंमध्ये वेदना आणि जळजळ झाल्यासारखे वाटणे