
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांची हत्या करण्यात आल्याची बातमी, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला. इमरान खान यांना पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या अदियाला जेलच्या बाहेर हजारो लोक जमा झाले. संपूर्ण देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं. रावळपिंडी, पेशावर आणि इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पीटीआयच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली. पाकिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, इमरान खान यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. जेल प्रशासनावरील दबाब इतका वाढला, अखेर त्यानंतर आता अदियाला जेल प्रशासनाकडून इमरान खान यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
जेल प्रशासनाने नेमकं काय म्हटलं
इमरान खान यांची हत्या करण्यात आली आहे किंवा जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे, हा आरोप अदियाला जेल प्रशासनाने फेटाळून लावला आहे. इमरान खान यांचा मृत्यू झालेला नाही किंवा त्यांची तब्येत देखील खराब नाही, इमरान खान हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही, असा खुलासा यावर आता जेल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे, तसेच इमरान खान हे अदियाला जेलमध्येच असून त्यांना इतरत्र कुठेही हालवण्यात आलं नसल्याचा खुलासा देखील जेल प्रशासनाने केला आहे, इमरान खान यांच्याबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे जेल प्रशासनाच्या खुलाशानंतर देखील पीटीआयच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला आहेत, इमरान खान यांना गुप्त पद्धतीने दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आल्याचा आरोप पीटीआयकडून करण्यात येत आहे. अनेक दिवस झाले इमरान खान यांच्या कुटुंबाला देखील त्यांची भेट घेऊ दिली जात नाहीये, वकिलांना देखील आत सोडलं जात नाहीये. जर इमरान खान समोर आले नाही तर आम्ही संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही यावेळी इमरान खान यांच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे.