
America H-1B Visa : आजघडीला अनेक तरुणांना अमेरिकेत जाऊन करिअरला नवी दिशा द्यावी, असे वाटते. विशेष म्हणजे उच्चशिक्षण घेतलेले हजारो तरुण अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यासाठी धडपडत असतात. परंतु अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणामुळे सगळंच बदलून गेलं आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे नियम कठोर केले आहेत. स्थानिकांनाच नोकऱ्या कशा मिळतील, यासाठी ट्रम्प यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी कमीत कमी परदेसी नोकरदारांनी अमेरिकेत यावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एच-1बी व्हिसा धोरणात बदल केले होते. आता पुन्हा एकदा अमेरिकन सरकार एच-1बी व्हिसासंदर्भात मोठा निर्णय घेत आहे. या निर्णयामुळे आता भारतासह जगभरातील कुशल कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन सरकार परदेशी नोकरदारांसाठी असलेल्या एच-1बी व्हिसामध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल करणार आहे. एच-1बी व्हिसा देण्यासाठी अमेरिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून लॉटरी सिस्टीम होती. आता ही प्रक्रिया रद्दबातल करून वेज-वेटेड सिस्टीम लागू केली जात आहे. या पद्धतीनुसार ज्या उमेदवाराकडे जास्त कौशल्य आहे, ज्या व्यक्तीचा पगार जास्त आहे असाच लोकांना एच-1बी व्हिसा प्राधान्याने दिला जाईल. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्योरिटी (डीएचएस) विभागाने तसे सांगितले आहे. आता नशीन नव्हे तर उमेदवारात असलेले कौशल्य आणि तुमचा पगार या आधारेच त्याला अमेरिकेत येण्यासाठी एच-1बी व्हिसा दिला जाणार आहे.
नव्या प्रणालीनुसार आता एच-1बी व्हिसा हवा असेल तर वेटेड सिलेक्शन प्रोसेस लागू होईल. या प्रणालीनुसार जास्त पगार आणि अधिक कौशल्य असणाऱ्यांनाच लवकर व्हिसा मिळेल. म्हणजेच वरिष्ठ पातळीवरील विशेष कौशल्य असणाऱ्यांनाच एच-1बी व्हिसा मिळण्याची शक्यता वाढेल. एन्ट्री लेव्हल आणि कमी नोकरीवर अमेरिकेत काम करण्यासाठी तयार असणाऱ्या तरुणांना अमेरिकेत जाण्यासाठी एच-1बी व्हिसा लवकर मिळणार नाही. हा नियम येत्या 27 फेब्रुवारी 2027 पासून लागू होईल.
दरम्यान, या निर्णयाचा भारतावरही परिणाम पडण्याची शक्यता आहे. आजघडीला एच-1बी व्हिसावर अमेरिकेत जाऊन काम करणाऱ्या भारतीयांची संख्या बरीच आहे. भविष्यात एन्ट्री लेव्हलवर एखाद्या तरुणाला अमेरिकेत जाऊन नोकरी करायची असेल तर त्याला एच-1बी व्हिसा मिळण्यास अडचणी येतील. परिणामी अमेरिकेत जाऊन काम करणाऱ्या भारतीयांची संख्या कमी होऊ शकते. असे असले तरी भविष्यात यावर काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.