
जगातील सर्वाधिक तेलाचा साठा असलेल्या व्हेनेझुएलावर अमेरिकेची वक्रदृष्टी फिरली आहे. वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या दिशेने त्यांचा युद्ध नौका पाठवल्या आहेत. अमेरिकेच्या या कुरापतीमुळे जगात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिका या इवल्याशा देशावर हल्ला करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे जग अस्थिर होण्याची भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. तर अमेरिकेच्या दादागिरीला लगाम घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
आम्ही कालपेक्षा आज अधिक मजबूत
व्हेनेझुएलचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी गुरुवारी लष्कराला संबोधित केले. व्हेनेझुएलात अमेरिकाला घुसखोरी करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण कॅरेबियन व्हेनेझुएलाच्या समुद्र परिसरात अमेरिकेच्या नौसेना दिसून आली आहे. नौसेना गस्त घालताना दिसत आहे. लॅटिन अमेरिकेतील ड्रग्ज कार्टेलविरोधातील ही मोहिम असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
तर मादुरो यांनी कालपेक्षा आज आपले लष्कर आणि लष्करी सामर्थ्य अधिक मजबूत झाल्याचा दावा केला. देशाची संप्रभूता आणि अखंडतेच्या संरक्षणासाठी आपण अधिक सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हेनेझुएलाच्या सरकारी वृत्तसंस्थेने त्यांचे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.
ड्रग्जमाफियाविरोधात आण्विक पाणबुडी कशाला?
जर अमेरिकेला ड्रग्ज माफियांविरोधात मोहिम राबवायची आहे तर मग व्हेनेझुएलाच्या समुद्रात त्यांनी आण्विक पाणबुडी कशाला तैनात केली असा सवाल विचारण्यात येत आहे. अमेरिकेच्या हेतूवर व्हेनेझुएलना पूर्वीपासूनच विश्वास नाही. संयुक्त राष्ट्र संघातील व्हेनेझुएलाचे राजदूत सॅमुअल मॉन्काडा यांनी अमेरिकन लष्कराच्या तैनतीवर तीव्र हरकत घेतली. ही एक प्रकारे दबाव प्रक्रिया आहे. व्हेनेएझुएला एक सार्वभौम आणि स्वतंत्र देश आहे. अशा प्रकारे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य नसल्याची हरकत त्यांनी नोंदवली.
अमेरिकेने या भागात 4500 हून अधिक अमेरिकन सैनिक, त्यात 2,200 नौदलाचे सैनिक आहे. तर आण्विक पाणबुडीचाही समावेश आहे. संभाव्य धोका लक्षात घेत व्हेनेझुएलाने कोलंबिया सीमेजवळ त्यांचे 15 हजार सैनिक तैनात केले आहे. तर दुसरीकडे या देशाने किनारपट्टीवर युद्ध नौका, ड्रोन आणि सैनिकांना तैनात केले आहे.