
Donald Trump H1-b Visa : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अमेरिकेला भारतात आपला व्यापारविस्तार करायचा आहे. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या मार्गाने भारताची कोंडी करू पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एचवनबी व्हिसावर तब्बल 88 लाख रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेत जाऊन करिअर घडवू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांनाच बसला आहे. असे असतानाच आता अमेरिकेतून मोठी अडपेड समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेतीलच खासदारांनी एचवनबी व्हिसासंदर्भातील हा नवा निर्णय रद्द करावा, असी मागणी केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यासाठी लागणाऱ्या एचवनबी व्हिसासाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी 88 लाख रुपयांचे शूल्क भरावे लागते. या व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीय तरुणच करतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाच बसतो आहे. असे असताना आता हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अमेरिकेत जोर धरू लागली आहे. अमेरिकेतील खासदारांनीच तशी मागणी केली आहे. एचवनबी व्हिसावर लावण्यात आलेल्या वाढीव शुक्लामुळे तसेच अन्य प्रतिबंधांमुळे अमेरिकेच्या तांत्रिक नेतृत्त्व क्षमतेला मोठे नुकसान होऊ शकते. सोबतच भारतासोबत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधही बिघडू शकतात, असे मत या खासदारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या सर्व भावना अमेरिकेच्या खासदारांनी ट्रम्प यांना एका पत्राद्वारे कळवल्या आहेत.
अमेरिकेने एचवनबी व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय 19 सप्टेंबर रोजी घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकन खासदार अमी बेरा, सालूद कार्बाजल, ज्युली जॉन्सन यांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एचवनबी व्हिसाबाबतच्या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर नकारात्मक प्रभाव पडत असून पूनर्विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
सोबतच, एचवनबी व्हिसा धोरण हे अमेरिकेच्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या क्षेत्रातील स्पर्धेचा आधारस्तंभ आहे, असेही मत या खासदारांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला एआय क्षेत्रातही मोठा फटका बसू शकतो, अशा भावना या पत्रात व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प भविष्यात एचवनबी व्हिसाबाबच्या धोरणात बदल करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.