
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी पहिल्यांदाच इराणच्या जनतेला संबोधित केलं आहे. त्यांनी इराणमधील जनतेला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण इराणचा शत्रू असलेल्या राष्ट्राला उद्ध्वस्त केलं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असताना खामेनेई यांना सुरक्षेसाठी एका बंकरमध्ये हलवण्यात आलं होतं, या बंकरमधूनच त्यांनी युद्धानंतर पहिल्यांदा देशातील जनतेशी संवाद साधला.
खामेनेई यांनी नेमकं काय म्हटलं?
ज्या लोकांना इराणी लोक आणि त्यांचा इतिहास माहिती आहे, त्यांना हे चांगलंच माहीत आहे की, इराण हे राष्ट्र आत्मसमर्पण करणारं राष्ट्र नाहीये. दरम्यान खामेनेई यांचं हे वक्तव्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर असल्याचं बोललं जात आहे, युद्ध सुरू असताना इराणने कोणतीही अट न ठेवता सरेंडर करावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
दरम्यान पुढे बोलताना खामेनेई यांनी अमेरिकेबाबत मोठा दावा केला आहे, इस्रायलच्या पराभवाच्या भीतीनं अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं युद्धात उडी घेतली कारण, जर आपण युद्धात प्रवेश केला नाही तर इस्रायल नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटत होती, त्यामुळे त्यांनी या युद्धात उडी घेतली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यांना या युद्धातून काहीही मिळालं नाही, या युद्धात इस्लामिक रिपब्लिक विजयी झाले आहे, ही अमेरिकेच्या तोंडावर जोरदार थप्पड आहे, असं खामेनेई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलसोबत जरी इराणचा युद्धविराम झाला असला तरी देखील सध्या इराणचे सैनिक हे रेडी टू अटॅक मोडमध्ये आहेत, अजूनही आपल्या अणू केंद्रांवर हल्ला होऊ शकतो अशी भीती इराणला आहे. जर असं काही घडलं तर आम्ही असे हल्ले परतून लावण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.