Black Cars: अजबच, या देशात काळ्या रंगाचे वाहन चालवणे ठरतो गुन्हा, कारण तरी काय?
Turkmenistan Cars: जगातील या देशात काळ्या रंगाचे वाहन चालवण्यावर बंदी आहे. जर कोणी काळं वाहन रस्त्यावर आणलं तर त्याला शिक्षा होते. का घेतल्या इथल्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय? कारण तरी काय?

Turkmenistan Cars: तुर्कमेनिस्तान हा देश कडक आणि अजब नियमांसाठी प्रसिद्ध आहे. अर्थात येथील शासकाच्या लहरीपणाचा फटका पर्यटकच नाही तर येथील नागरिकांनाही बसतो. या देशात काळी कार, वाहनाला पूर्णपणे बंदी आहे. काळ्या वाहनांना या देशाची राजधानी अश्गाबातमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या देशाच्या राजधानीत नेहमी पांढऱ्या अथवा फिक्कट रंगाचीच वाहनं दिसतात. हा अजब फतवा येथील राष्ट्रपती गुरबांगुली यांनी काढला आहे. पांढरा रंग हा पावित्र्याचा आणि चांगल्या भाग्याचे प्रतिक मानल्या जाते. तर काळा रंग हा दुःखाचा आणि दुर्भाग्याचा मानला जातो.
काळ्या वाहनांना अशुभ का मानले जाते?
येथील राष्ट्रपती गुरबांगुली हे पांढऱ्या रंगाला अधिक महत्त्व देतात. काही वृत्तानुसार, पांढरा रंग हा मांगल्य आणि पवित्रतेचे प्रतिक आहे असे माजी राष्ट्रपती मानत होते. राजधानी अश्गाबातमध्ये पांढऱ्या आणि इतर चमकदार रंग, फिकट रंगाला प्राधान्य देण्यात येते. राजधानीत काळी वाहनं ठेवण्यास, चालवण्यास आणि त्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या परिसरात अशी वाहनं चालवणं अवघड आहे. पण हा नियम इतर राष्ट्राध्यक्षांच्या वेळी पाळल्या जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बंदीला सुरुवात कधी?
काळ्या वाहनांवरील ही बंदी आताची नाही. 2015 मध्ये सरकारने पहिल्यांदा काळ्या कारच्या आयातीवर बंदी घातली. यामुळे नागरिकांना काळी वाहनं देशात मिळण्यास अडचण झाली. 2018 मध्ये राजधानीत काळ्या रंगाची वाहनं आणण्यास, ठेवण्यास बंदी घालण्यात आली. ज्याच्यांकडे काळी वाहनं आहेत, त्या मालकांविरोधात कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली होती. जी काळी वाहनं होती, ती सरकारकडे सोपवण्याची आणि दुसऱ्या रंगाची वाहनं नेण्याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतर कार मालकांनी रंग बदल केले. त्यासाठी मोठा खर्च केला.
राजधानीत पांढऱ्या रंगाच्याच कार हव्यात
या देशाच्या राजधानीत पांढऱ्या रंगाच्याच कार चालवल्या जातात. तुर्कमेन राजधानीला व्हाईट सिटी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी या शहरात पांढऱ्या रंगाचा अतिरेक करण्यात येत आहे. वास्तुशिल्पीही पांढरी आहेत. तर ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या पांढऱ्या करण्याचाच सपाटा लावण्यात येत आहे. येथील शासकीय कार्यालयं आणि घरंही पांढऱ्या रंगात न्हाऊन निघालेली आहेत.
