ब्लड मनी काय आहे? निमिषा प्रिया प्रकरणात काय घडणार? यमनकडे भारतीयांच्या नजरा

यमनच्या तुरुंगात असलेल्या केरळमधील निमिषा प्रिया या नर्सला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. निमिषाला वाचवण्यासाठी केवळ 'ब्लड मनी' मार्ग उरला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्लड मनी काय आहे? निमिषा प्रिया प्रकरणात काय घडणार? यमनकडे भारतीयांच्या नजरा
nimisha priya
| Updated on: Jul 09, 2025 | 6:28 PM

गेल्या तीन वर्षांपासून यमनच्या तुरुंगात असलेल्या केरळमधील निमिषा प्रिया या नर्सला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. प्रियाला वाचवण्याचे कायदेशीर मार्ग आता संपले आहेत. निमिषाला वाचवण्यासाठी केवळ ‘ब्लड मनी’ मार्ग उरला आहे. हा मार्ग कायदेशीर आहे परंतु ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबावर हे अवलंबून आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण?

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील निमिषा प्रिया 2008 साली यमनला गेली होती. जिथे तिने अनेक रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केले, कालांतराने तिने स्वतःचे क्लिनिक उघडले. यासाठी तिने तलाल अब्दो मेहदीशी पार्टनरशीप केली होती. नंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि निमिषाच्या तक्रारीनंतर मेहदीला तुरुंगवास झाला.

बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा निमिषाला त्रास दिला. मेहदीने निमिषाचा पासपोर्टही जप्त केला होता. आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने मेहदीला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले होते, मात्र यात तो मरण पावला. या हत्येसाठी निमिषाला जबाबदार धरण्यात आले व तिच्याविरोधात गु्न्हा सिद्ध झाला. आता तिला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

निमिषाचा पती टॉपी थॉमस आणि मुलीला अशी आशा आहे की ब्लड मनीच्या माध्यमातून निमिषाला माफी मिळेल. तलाल अब्दो मेहदीच्या कुटुंबाने ब्लड मनीसाठी सहमती दिली तर तिची शिक्षा वाचू शकते. आतापर्यंत मेहदी कुटुंबाला अनेक वेळा ब्लड मनीची ऑफर देण्यात आली आहे, मात्र मेहदी कुटुंबाकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

ब्लड मनी म्हणजे काय?

सोप्या भाषेत बोलायचे झाले तर, ब्लड मनी म्हणजे आरोपीने पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला दिलेली आर्थिक भरपाई. ब्लड मनी अनावधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणांमध्ये लागू होते. मात्र पीडित व्यक्तीचे कुटूंब गुन्हेगाराला माफ करतात की नाही यावर हे सर्वकारी अवलंबून असते.

इस्लामिक कायद्यानुसार, गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यायची यावर पीडितांना मत मांडण्याचा अधिकार आहे. हत्येच्या बाबतीत गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. मात्र पीडित व्यक्चीचे कुटुंब काही रकमेच्या बदल्यात गुन्हेगाराला माफ करण्याचा पर्याय देखील निवडू शकतात. यामुळे पैशांच्या मोबदल्यात शिक्षा माफ होते.

निमिषा प्रियाकडून तलालच्या कुटुंबाला ब्लड मनी म्हणून 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 8.57 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र तलालच्या कुटुंबाने यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता निमिषाला फाशी मिळणार की नाही हे तलालच्या कुंटुंबावर अवलंबून असणार आहे.