’12 दिवसांनंतर युद्ध थांबले…’, इराण-इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाली आहे. युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल. इराणला प्रथम त्याचे पालन करावे लागेल. इराणने युद्धबंदीचे पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्रायल युद्धबंदीत सामील होईल.

Iran Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. 12 दिवसांनंतर दोन्ही देश युद्ध थांबवण्यास तयार झाले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर म्हटले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्ष तीव्र होण्याची शक्यता होती.
ट्रम्प काय म्हणाले…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाली आहे. युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल. इराणला प्रथम त्याचे पालन करावे लागेल. इराणने युद्धबंदीचे पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्रायल युद्धबंदीत सामील होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचे मानले जाईल. मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे, त्यांच्याकडे असलेली सहनशक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता याबद्दल अभिनंदन करू इच्छितो.
13 जून रोजी इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले केले होते. गेल्या 12 दिवसांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलला अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला. त्यानंतर अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकन सैन्याने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने पलटवार केला. इराणने कतारमधील दोहा येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागले. यामुळे इराण-अमेरिका तणाव वाढण्याची शक्यता वाढली होती. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रबंदीबाबत निर्णय झाल्याचे म्हटले आहे.
US President Donald Trump posts, "CONGRATULATIONS TO EVERYONE! It has been fully agreed by and between Israel and Iran that there will be a Complete and Total CEASEFIRE (in approximately 6 hours from now, when Israel and Iran have wound down and completed their in progress, final… pic.twitter.com/a6mSgitrzn
— ANI (@ANI) June 23, 2025
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इस्रायलनेही इराणसोबत युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. इराणने आता तेल अवीववर हल्ला केला नाही तर इस्त्रायल इराणवर हल्ला करणार नाही. इराणकडूनही आता तेल अवीववर हल्ला करणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
खामेनी काय म्हणाले?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कतारमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यावर म्हटले आहे की, या हल्ल्यात आम्ही कोणालाही इजा केली नाही. या हल्ल्याची माहिती आम्ही कतारला आधीच दिली होती. इराण कोणत्याही परिस्थितीत कोणाचे आक्रमण स्वीकारणार नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही. ही इराणची विचारसरणी आहे, असे ते म्हणाले.
