India-China : मैत्रीच्या नावाखाली पुन्हा एकदा चीनचं विश्वासघातकी कृत्य, फिंगर्सजवळ नव्या कारस्थानाचा पर्दाफाश
India-China : चीनचं एक नवीन कारस्थान उघड झालं आहे. त्यामुळे चीनवर विश्वास तरी कसा ठेवायचा? हा प्रश्न निर्माण होतो. सध्या चीन भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन असल्याचं दाखवत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार सुद्धा वाढला आहे. पण त्याचवेळी चीनचा वाईट इरादा समोर आला आहे.

लडाखच्या पँगाँग त्सो तळ्याजवळ पुन्हा एकदा चीनचे नापाक इरादे समोर आले आहेत. लेटेस्ट सॅटलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. चीन बफर झोनच्या खूप जवळ वेगाने सैन्य इमारती, रस्ते बनवत आहे. फक्त सॅटलाइट इमेजच नाही, तर टीव्ही 9 भारतवर्ष एक्सक्लुसिवली त्या भागापर्यंत पोहोचलं आहे. बफर झोनजवळ चीनकडून सुरु असलेली नको ती कामं कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लडाखमध्ये LAC जवळ असलेल्या या डोंगराळ भागाला फिंगर्स एरिया म्हटलं जातं. बफर झोनजवळ चीनकडून सुरु असलेलं बांधकाम, सैन्य ढांचे, रस्ते आणि सर्विलांस पोस्टचे फोटो कॅमेऱ्यात कैद झालेत. यावरुन बिजींगच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पँगाँग तळं जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. हेच तळं भारत आणि चीनमध्ये असलेल्या वादाचं मुख्य कारण सुद्धा आहे. कडाक्याच्या थंडीमुळे तळ्याचा एक भाग पूर्णपणे बर्फ बनला आहे. पँगाँग तळ्याजवळ डोंगर आहेत. भारतीय सैन्याकडून या भागाला फिंगर्स म्हटलं जातं.
हे डोंगर बोटांसारखे दिसतात. म्हणून त्यांना फिंगर म्हटलं जातं. असे एकूण आठ डोंगर आहेत. LAC फिंगर 8 पर्यंत असल्याचा भारताचा दावा आहे. चीनचं म्हणणं आहे की, LAC फक्त फिंगर 2 पर्यंत आहे. हेच वादाचं कारण आहे. काही वर्षांपूर्वी चीनने फिंगर 4 जवळ स्थायी बांधकामाचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या कठोर विरोधानंतर त्यांना माघार घ्यावी लागलेली. परिस्थिती बिघडल्यानंतर दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आलेलं. त्यानंतर भारताने तळ्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली. रडार, एअर डिफेन्स सिस्टिम आणि सर्विलान्स बोटीतून पेट्रोलिंग सुरु झालं. आज भारतीय सैन्य फिंगर 1 पासून फिंगर 4 पर्यंत नियमित पेट्रोलिंग करतं.
वादाचं कारण असेलली फिंगर 5 पॉलिसी काय आहे?
फिंगर 5 ते फिंगर 8 दरम्यान दोन्ही देश पेट्रोलिंग करत नाहीत. पण भारताचं या भागावर अत्यंत बारीक लक्ष आहे. कारण चीनने या बफर झोनजवळ आपलं मिलिट्री इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आहे. चीनने या भागात अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केलाय. पण प्रत्येकवेळी समोर त्यांना भारतीय सैन्याचा सामना करावा लागला आहे. मात्र, तरीही चीन सुधारण्याचं नाव घेत नाहीय. चिनी नेते माओ यांची 1940 च्या दशकातील फिंगर 5 पॉलिसी या वादाचं मुख्य कारण आहे. चिनी नेते माओ तिबेट आणि त्याच्याशी संबंधित भागांना चीनचा हिस्सा मानतात. लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळ पर्यंतच्या प्रदेशावर चीन दावा करतो. माओने या पाच क्षेत्रांना आपल्या उजव्या हाताची पाच बोटं आणि तिबेट हात असल्याचं म्हटलं होतं.
