
China Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फस्ट’ या धोरणामुळे जागतिक राजकारण चांगलेच बदलले आहे. ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर लादलेल्या टॅरिफमुळेही अनेक देश सावध झाले आहेत. भारत, चीन, रशिया यासारखे देश व्यापारवाढीसाठी नवे मित्र शोधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चीन, रशिया यासारख्या देशांकडून अनेक नियमांत शिथिलतआणली जात आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळेच भारत आणि चीन एकमेकांच्या जवळ आले आहेत. दोन्ही देशांत व्यापारवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आथा भारत आणि चीन यांच्यातील संबंध आणखी वृद्धींगत व्हावेत म्हणून चीनने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीयांना मोठा लाभ होणार आहे.
सध्या भारत आणि चीन यांच्यातील संबंध बदलत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. असे असतानाच चीनने आपल्या व्हिसाच्या धोरणात मोठा बदल केला आहे. आता भारतीयांना चीनला जाण्यासाठी व्हिसा हवा असेल तर कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चीनने भारतीयांना व्हिसा मिळावा यासाठी ऑनालाईन अर्ज प्रक्रिया चालू केली आहे. भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर चीनने ही सुविधा थांबवली होती. आता पुन्हा एकदा ती सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयाबाबत चीनचे भारतातील राजदूत शू फहॉन्ग यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडियावर अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार 22 डिसेंबर 2025 पासून भारतीयांना चीनला जाण्यासाठी व्हिसा हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यामुळे भारतीयांना आता चीनी दूतावास किंवा व्हिसा सेंटरला जाण्याची गरज पडणार नाही. घरी बसल्या-बसल्या चीनचा व्हिसा मिळणार आहे. चीनला शह देता यावा म्हणून अमेरिकेने भारतासोबत संबंध वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता भारत आणि चीन जवळ आले आहेत. असे असताना आता चीनने व्हिसासंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, चीनसोबतच्या संबंधात सुधारणा झाल्यानंतर भारतानेही चीनी नागरिकांना याआधीच व्हिसा देण्यास सुरुवात केलेली आहे. 2020 साली भारत-चीन सीमेवर तणाव झाल्यानंतर भारताने चीनी नागरिकांसाठी व्हिसा देण्याची सुविधा बंद केली होती. त्यानंतर आता चीननेही भारतीयांना व्हिसा मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. चीनच्या या निर्णयाचा लाखो भारतीयांना फायदा होणार आहे.