
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांपूर्वी भारतावरील वस्तूंवर 25% कर लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अमेरिकेने भारताला आणखी एक दणका दिला आहे. इराणकडून तेल आणि पेट्रोकेमिकल पदार्ख खरेदी करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने एकूण 20 जागतिक कंपन्यांवर ही कारवाई केली आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
भारतातील सहा कंपन्यांसह जगातील 20 कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. यात अमेरिकेने म्हटले की, ‘या भारतीय कंपन्यांनी इराणी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करत होत्या, हे अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनात अमेरिकेने म्हटले की, “इराण सरकार या व्यापारातून मिळालेल्या पैशांचा वापर परदेशी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या नागरिकांवर अत्याचार करण्यासाठी करत आहे. त्यामुळे इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने या 6 भारतीय कंपन्यांवर बंधी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या कंपन्यांची अमेरिकेतील मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे. तसेच आता कोणतीही अमेरिकन कंपनी या 6 कंपन्यांसोबत व्यवहार करणार नाहीत.
इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. 2015 च्या अणुकरारातून माघार घेतल्यापासून अमेरिका इराणवर सतत आर्थिक निर्बंध लावत आहे. इराणच्या ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रांवर विविध निर्बंध लादण्यात आलेले आहेत. याच धोरणाचा एक भाग म्हणून आता हे पाऊस उचलण्यात आले आहे. इराणच्या तेलाच्या उत्पन्नावर मर्यादा घालण्यासाठी अमेरिका असे निर्णय घेत असल्याचे समोर आले आहेत.
रशियाकडून तेल खरेदी करण्याची शिक्षा म्हणून अमेरिकेने भारतावर 25% कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आता 6 कंपन्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. आता या दोन्ही निर्णयांमुळे भारत-अमेरिकेतील व्यापारी संबंध बिघडण्याची शक्यता आहे.