
Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे एकमेकांना भेटणार आहेत. दोन्ही बलाढ्य देशांचे सर्वोच्च नेते यांच्यात ही बैठक असल्यामुळे संपूर्ण जगाचेच या बैठकीकडे लक्ष लागले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, आता या बैठकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत देश आणि भारतावर लावलेल्या टॅरिफचा उल्लेख केलाय. त्यांनी भारतावर टॅरिफ का लावला? याचेही उत्तर अप्रत्यक्षपणे दिले आहे. विशेष म्हणजे भारतावरच्या टॅरिफमुळेच रशिया बैठकीला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय. त्यामुळे आता भारतावरील टॅरिफमुळे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताचे मोठा आर्थिक नुकसान होत आहे. याचाच संदर्भ देत ट्रम्प यांनी मोठा दावा केलाय. पुतिन यांची भेट घेण्याआधी ट्रम्प यांनी काही माध्यम संस्थांना मुलाखती दिल्या. या मुलाखीत त्यांनी रशियाला कात्रीत पकडण्यासाठी भारतावर टॅरिफ लावल्याचं सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफबाबत विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी परिणाम होतच असतो. तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर आम्ही तुमच्याकडून आयातशुल्क घेऊ असे जेव्हा भारताला सांगण्यात आले तेव्हा भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले. परिणामी रशियाने मला फोन केला आणि भेटण्याची विनंती केली. आता या भेटीत नेमकं काय होतं, ते पाहुया,’ असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा दुसरा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. याचाही संदर्भ ट्रम्प यांनीद दिला. जेव्हा तुम्ही तुमचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक गमावणार असता किंवा पहिल्या क्रमांकाच्या ग्राहकालाही गमावण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा कदाचित अशा प्रकारचे निर्णय (रशियाकडून भेटीची विनंती) घेतले जातात, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्याचे म्हटले. भारताने मात्र आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केलेले नाही, असे स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, अलास्का येथील भेटीआधी ट्रम्प यांनी पुतिन यांना एका प्रकारची धमकीच दिलेली आहे. या बैठकीत युक्रेनसोबतचे युद्ध रोखण्यावर एकमत न झाल्यास पुतिन यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच ट्रम्प यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.