
अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के कर लादण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी त्यांनी वाणिज्य विभाग आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधींना यासंदर्भात निर्देश दिले. अमेरिकन चित्रपट निर्मात्यांना परदेशात आकर्षित करण्यासाठी इतर देशांनी प्रोत्साहन दिले होते. त्याबद्दल ट्रम्प यांनी टीका केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, अमेरिकन चित्रपट उद्योग वेगाने नष्ट होत आहे. हा इतर देशांचा एकत्रित प्रयत्न आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा धोका आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एक प्रचार आहे. अमेरिकेत पुन्हा चित्रपटांची निर्मिती व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. नवीन टॅरिफमुळे स्टुडिओला पुन्हा अमेरिकेत आणण्याचा उद्दिष्ट आहे. अमेरिकेतच चित्रपटांची निर्मिती होण्यासाठी प्रोत्साहन देणे आम्ही सुरु ठेवणार आहे. गेल्या दशकात अमेरिकेतील चित्रपट उद्योगात लॉस एंजेलिसमधील चित्रपट आणि दूरदर्शन निर्मितीमध्ये अंदाजे ४०% घट झाली आहे. हॉलिवूड आणि अमेरिकेतील त्यावर अवलंबून असणारे इतर अनेक भागावर त्याचा परिणाम होत आहे. आम्हाला पुन्हा अमेरिकेत चित्रपट बनवायचे आहेत.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर चित्रपट निर्माते संतापले आहेत. निर्मात्यांनी म्हटले की, नव्या टॅरिफमुळे आमचा व्यवसाय संपेल. आपल्याला मिळवण्यापेक्षा गमावण्यासारखे बरेच काही आहे. यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरु केला आहे. अमेरिकेला टॅरिफ लावणाऱ्या देशांवर त्यांनी रिसीप्रोकल टॅरिफ लावले आहे. त्यामुळे चीनने अमेरिकेवरील टॅरिफ वाढवले होते. चीन-अमेरिकेतील टॅरिफ वॉर जगभरात चर्चेचा विषय आहे.
रविवारी ट्रम्प यांनी सॅन फ्रान्सिस्को खाडीतील अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याच्या योजनेचेही खुलासा केले. १९६३ मध्ये बंद होण्यापूर्वी देशातील काही कुख्यात गुन्हेगारांना या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याचे विस्तार करण्याचे निर्देश ट्रम्प यांनी न्याय विभाग, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी यांच्या समन्वयाने कारागृहाला दिले.