
भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून वाद चिघळला आहे. त्यामध्येच आता अत्यंत धक्कादायक असा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला आहे. एका भारतीय ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे इतर भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अमेरिकेमध्ये झालेल्या एका अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी नवीन वर्किंग व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी घातली, हा अत्यंत मोठा धक्का आहे. परदेशी चालकांची वाढती संख्या अमेरिकन रस्त्यांसाठी धोका निर्माण करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पंजाबमधील हरजिंदर सिंग नावाच्या चालकाने फ्लोरिडातील एका महामार्गावर चुकीचे वळण घेतले आणि मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर तपासात धक्कादायक माहिती पुढे आली, हरजिंदरने 2018 मध्ये मेक्सिकन सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला आणि त्याने कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन येथून व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले.
Effective immediately we are pausing all issuance of worker visas for commercial truck drivers.
The increasing number of foreign drivers operating large tractor-trailer trucks on U.S. roads is endangering American lives and undercutting the livelihoods of American truckers.
— Secretary Marco Rubio (@SecRubio) August 21, 2025
हेच नाही तर त्याला इंग्रजी व्यवस्थित येत नसताना देखील त्याने परिवहन विभागाची परीक्षा दिली. रस्ता चिन्ह चाचणीत तो नापास झाला. 12 पैकी त्याला फक्त 2 प्रश्नाची उत्तरे देता आली. वाहतूक सचिव शॉन डफी यांनी ही अत्यंत मोठी चूक असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, नियमांकडे दुर्लक्ष यामुळे ट्रकिंग उद्योग धोकादायक बनला आहे. त्यांनी या अपघाताचे वर्णन टाळता येण्याजोगी दुर्घटना म्हणून केले. यानंतर आता थेट व्यावसायिक ट्रक चालकांसाठी नवीन वर्किंग व्हिसा अमेरिकेकडून बंदच करण्यात आला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, परदेशी चालकांची वाढती संख्या ही एक अमेरिकन रस्त्यांसाठी धोका निर्माण करत आहे, हेच नाही तर याचा परिणाम स्थानिक चालकांवर होत असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. मुळात म्हणजे अमेरिकेमध्ये वाहतूक उद्योगात चालकांची संख्या कमी आहे. आता या निर्णयामुळे मालवाहतूक शुल्क महाग होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम महागाईवर होण्याची दाट शक्यता आहे. एक अपघातानंतर अमेरिकन सरकारला हा मोठा निर्णय घेतला आहे.