
America Shutdown : निधी विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने आता अमेरिकेत शटडाऊन लागले आहे. या निर्णयामुळे आता डोनाल्ड ट्रम्प सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. हा शटडाऊन असाच चालू राहिला तर भविष्यात ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची तर शक्यता आहेच. पण यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. म्हणजेच शटडाऊनमुळे ट्रम्प यांच्यापुढे नवे संकट उभे राहू शकते. अमेरिकेत शटडाऊन झाल्यानंतर रिपोर्ट एफबीआयने एक गुप्त रिपोर्ट तयार केला आहे. हा रिपोर्ट ट्रम्प सरकारला देण्यात आला असून यात ट्रम्प सरकारला अनेक महत्त्वाचे इशारे देण्यात आले आहेत.
अमेरिकेतील शटडाऊन असाच चालू राहिला तर भविष्यात कठीण परिस्थिती ओढवू शकते. तसे संकेत एकीकडे व्हाईट हाऊस आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी दिले आहेत. व्हाईट हाऊसच्या एका पत्रकार परिषदेत व्हेन्स यांनी शटडाऊनवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये निधी विधेयक मंजूर करताना असाच संघर्ष कायम राहिला तर भविष्यात सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. कर्मचारीकपात होऊ शकते, असे विधान केले. अशा प्रकारे नोकऱ्या गेल्या तर त्याचा परिणाम पुढचे कित्येक वर्षे राहतो, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील शटडाऊनवर तेथील एफबीआय या जगप्रसिद्ध तपास यंत्रणेने सरकारला काही महत्त्वाचे इशारे दिले आहेत. या शटडाऊनमुळे फॉरेन्सिक तसेच तपासाच्या कामावर परिणाम पडू शकतो. तसेच संसाधनांची कमतरता निर्माण झाल्यामुळे देशात दहशतवाद, ड्रग्ज तस्करी, सायबर ग्रुन्ह्याविरोधात काम करतानाही मर्यादा येऊ शकतात, असे एफबीआयने आपल्या अहवालात सांगितले आहे. तसेच एफबीआयच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी शटडाऊनला ‘राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा’ म्हणून ग्राह्य धरले असून आता अमेरिकेला अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.