
Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाअंतर्गत बरेच धक्कादायक निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. सोबतच त्यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कात तब्बल 88 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतालाच बसत आहे. असे असतानाच आता अमेरिकेत अनेक घटना घडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेसमध्ये मतैक्य न झाल्याने तिथे शटडाऊन लागले आहे. याच शटडाऊनमुळे आता ट्रम्प यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला तात्तपुरतं स्थगित करावं लागलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अमेरिकेत आयात करण्यात येणाऱ्या ब्रँडेड औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका भारत तसेच इतर देशांतील औषधनिर्माण कंपन्यांनवर होणार आहे. मात्र अमेरिकेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेता ट्रम्प सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. ट्रम्प यांनी औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबर रोजीपासून केली जाणार होती. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून ट्रम्प सरकार औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांशी चर्चा करून या कंपन्यांची अमेरिकेतील गुंतवणूक कशी वाढेल, यावर चर्चा करणार आहे. 100 टक्के टॅरिफ न लादता या कंपन्यांसोबत वाटाघाटी करण्याचा ट्रम्प सरकारचा उद्देश आहे.
डोनाल्ड ट्रम्प सध्या इतर देशांतील औषधनिर्माण कंपन्यांशी चर्चा करून अमेरिकेतील त्यांची गुंतवणूक कशी वाढेल, यावर तोडगा काढणार आहेत. त्यासाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले जाणार आहे. मात्र ज्या कंपन्या चर्चेला तयार होणार नाहीत, त्यांना मात्र 100 टक्के टॅरिफला सामोरे जावे लागणार आहे. तसा इशाराच ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. टॅरिफच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याकडून औषधनिर्माण कंपन्यांवर एका प्रकारे दबावच टाकला जात आहे.