पाकिस्तानने अमेरिकेसमोर गुडघे टेकले, मात्र भारताच्या कृत्याने ट्रम्प नाराज; माजी रॉ प्रमुख अमेरिकेवर बरसले
काही दिवसांनी अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. अशातच आता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी ट्रम्प आणि अमेरिकेवर भाष्य केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवविलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती, मात्र 3 दिवसांच्या तणावानंतर युद्धबंदीची घोषणा झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध मी थांबवला असा दावा केला होता, मात्र भारताने याला नकार दिला होता. यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. अशातच आता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी ट्रम्प आणि अमेरिकेवर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
माजी RAW प्रमुख विक्रम सूद यांनी ट्रम्प यांच्याबद्दल काय म्हटले?
माजी RAW प्रमुख विक्रम सूद यांनी ANI ला एक मुलाखत दिली. यात त्यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धबंदी करारात आपली भूमिका असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, मात्र हा दावा भारताने फेटाळून लावला. यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले. तसेच अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध मजबूत झाले. कारण पाकिस्तानी लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकून म्हणाले, ‘धन्यवाद, माय लॉर्ड. तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळालया हवा.’
अमेरिका भारताच्या प्रगतीला घाबरते
विक्रम सूद पुढे बोलताना म्हणाले की, ‘अमेरिकेला भारताची आर्थिक प्रगती नको आहे. अमेरिका भारताच्या आर्थिक विकासाला घाबरते, कारण भारत आणि चीन आता दोन प्रमुख आर्थिक शक्ती आहेत. चीन ही एक मोठी आर्थिक शक्ती आहे आणि अमेरिकेने चीनकडून धडा घेतला आहे. त्यामुळे त्यांना भारताचा विकास नको आहे. भारताचा विकास झाल्यास आगामी काळात अमेरिकेसाठी प्रतिस्पर्धी निर्माण होईल, त्यामुळे अमेरिका भारताच्या प्रगतीवर नाराज आहे.’
दरम्यान, अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. या कराच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता. मात्र भारतानेही आता नवीन खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच जीएसटी दरांमध्ये बदल करुन भारतीय मालाला भारतातच बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणांचा भारतावर फारसा परिणाम झालेला नाही.
