अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात काय वाकडं? ट्रम्प का चिडतात? जाणून 5 मोठी कारणं

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. दोन्ही देशात टोकाचे मतभेद आहेत. त्यात अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध लादले आहेत. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पण असं का त्याबाबतची पाच कारणं समजून घ्या.

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात काय वाकडं? ट्रम्प का चिडतात? जाणून 5 मोठी कारणं
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात शत्रुत्व का? ट्रम्प का चिडतात? जाणून 5 मोठी कारणं
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 21, 2025 | 6:55 PM

अमेरिका हे जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाते. अनेक देशांवर अमेरिकेचा दबाव असल्याचं दिसून आलं आहे. तर काही देश अमेरिकेच्या अगदी विरोधी आहेत. यात व्हेनेझुएला हा एक देश आहे. बलाढ्य अमेरिकेला व्हेनेझुएला भीक घालत नाही. असं असताना दोन्ही देश पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. ड्रग्ज तस्करी गटांवर कारवाई करण्याच्या बहाण्याने अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाला तीन युद्धनौका पाठवल्या आहेत. व्हेनेझुएला सरकार ड्रग्ज तस्करीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. पण व्हेनेझुएलाने हा आरोप फेटाळून लावला आणि 45 लाख सैनिक तैनात करण्याची घोषणा करून ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी तीव्र शब्दात अमेरिकेवर आगपाखड केली आहे. अमेरिका वेडी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. पण या दोन राष्ट्रांमध्ये इतकं टोकाचं वैर का? ती पाच कारणं समजून घेऊयात.

व्हेनेझुएला अमेरिकेच्या वर्चस्वाच्या भीक घालत नाही : अमेरिका आशियापासून युरोप आणि आफ्रिकेपर्यंत अनेक देशात हस्तक्षेप करत आहे. इतकंच काय तर काही युद्ध थांबवल्याचा दावाही केला आहे. अमेरिकेचं न ऐकणाऱ्या देशांना दणका दिला आहे. तिथली सरकारं उलथवून लावली आहेत. इराकमध्ये सद्दाम हुसेन आणि लिबियामध्ये कर्नल गद्दाफी यांच्यासह बांगलादेशमध्ये शेख हसीनाचं सरकार उलथवून लावण्यात अमेरिका आहे. सीरियामध्ये राष्ट्राध्यक्ष असद यांना देश सोडून पळून जावं लागलं. पण इतका शक्तिशाली देश व्हेनेझुएलाचे काहीच वाकडं करू शकत नाही.

व्हेनेझुएलाचा मैत्री करण्यास नकार : व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्यूगो चावेझपासून सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरोपर्यंत सर्वजण अमेरिकेला साम्राज्यवादी शक्ती मानतात. अमेरिकेच्या कुटनितीचा अंदाज असल्याने कधीच मैत्रीचा हात पुढे केला नाही. कारण अमेरिका थेट सत्ता मिळवत नसली तरी हस्तक्षेप आणि दबाव आणते. व्हेनेझुएलाच्या या पवित्र्यामुळे अमेरिकेने अनेक निर्बंध लादले आहेत. पण तरीही व्हेनेझुएला अमेरिकेपुढे झुकलं नाही.

मादुरोवर बक्षिसाची दुप्पट रक्कम, तरीही…: व्हेनेझुएलावर दबावासाठी ट्रम्प प्रशासनाने राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना जगातील मोठा ड्रग्ज तस्कर म्हणून घोषित केले. तसेच पकडून देण्यासाठी बक्षिसाची रक्कम देखील वाढवली. मादुरोवर 217 कोटींच बक्षीस वाढवून आता 435 कोटी केले आहे. तरीही मादुरो झुकले नाहीत आणि अमेरिकेला पकडून दाखवण्याचं थेट आव्हान दिले.

व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी : अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध लादले आहेत. सर्वोतोपरी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्याकडूनच तेल खरेदी करण्याची वेळ अमेरिकेवर आहे. इतकंच काय तर इतर कोणी खरेदी करेल त्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा जाहीर केलं होतं. पण तरीही व्हेनेझुएलाचं काहीच वाकडं करू शकले नाहीत.

व्हेनेझुएलाची समुद्री सीमा आकर्षणाचे केंद्र : व्हेनेझुएलाची उत्तरेकडील सीमा कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक समुद्राला मिळते.हा भाग कॅरिबियन प्रदेशातील व्यापार मार्ग आणि तेल निर्यातीसाठी महत्त्वाच्या समुद्री मार्गांवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच अमेरिकेला पोटदुखी आहे. त्यासाठी व्हेनेझुएलाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छिते. पण मादुरो त्यांच्या कोणत्याच दबावाला भीक घालत नाहीत.