डोनाल्ड ट्रम्पची शांतीदूत होण्याची धडपड! पण दोन देशांनी अमेरिकेविरुद्ध युद्धासाठी ठोकला शड्डू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. जगभरातील युद्धांना पूर्णविराम देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तसेच वारंवार युद्ध थांबवल्याची बतावणीही करत आहेत. पण असं होत असताना दुसरीकडे मात्र दोन देश अमेरिकेविरुद्ध लढाईसाठी सज्ज आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इतकंच काय तर काही युद्ध थांबवल्याचा दावाही केला आहे. गेल्या सहा महिन्यात सहा युद्ध थांबवल्याचं त्यांनी दावा केला आहे. तसेच रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. यासाठी त्यांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची हाव लागली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: शांततादूत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण असं असताना अमेरिकेविरुद्ध दोन देशांनी शड्डू ठोकला आहे. एकीकडे व्हेनेझुएला आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाच्या किम जोंगने अमेरिकेविरुद्ध मोर्चा उघडला आहे.
लॅटीन अमेरिकेत व्हेनेझुएलाने आपले 4.5 दशलक्ष मिलिशिया सक्रिय केले आहेत. कोणतेही साम्राज्य व्हेनेझुएलाच्या पवित्र मातील स्पर्श करू शकत नाही, असं ते उघडपणे सांगत आहेत. तर आशिया खंडातील उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन चांगलाच संतापला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त युद्ध सराव सुरु केला आहे. हा सराव युद्धाची तयारी असल्याचं हुकूमशहा किम जोंगचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याने अण्वस्त्राचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे.
व्हेनेझुएला विरुद्ध अमेरिका
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेने सीमेजवळ नौदल जहाज पाठवल्याचा वृत्ताबाबत गंभीर निर्णय घेतला आहे. देशभरात 45 लाख मिलिशिया तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मादुरो यांनी स्पष्ट केलं की, ‘कोणतेही साम्राज्य व्हेनेझुएलाच्या पवित्र भूमीला स्पर्श करू शकत नाही.’ सीएनएनच्या वृत्तानुसार, मागच्या आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या सागरी क्षेत्रात तीन नौदल विनाशकारी जहाजे आणि 4 हजार सैनिक पाठवण्याची तयारी केली होती. पण अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने असा दावा खोडून काढला आहे. दुसरीकडे, व्हेनेझुएला कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यास सज्ज आहे.
उत्तर कोरियाने थेट अणुहल्ल्याचा इशारा
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊन याने तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट धमकी दिली आहे. दोन्ही देशांनी संयुक्त लष्करी सराव सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांचे उत्पादन वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. किम जोंग स्पष्टच म्हणाला की, शत्रू एक हुशार चाल खेळत आहे. त्यांना शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अण्वस्त्र.. उत्तर कोरिया हा जगातीलअण्वस्त्रे असलेल्या 9 देशांपैकी एक आहे.
