पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली, पोलिस स्टेशनवर ड्रोन हल्ला

भारत-पाकिस्तानातील संघर्षानंतर पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका पोलिस स्टेशनवर ड्रोन हल्ला केला. यात काही पोलिस जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली, पोलिस स्टेशनवर ड्रोन हल्ला
drone attacks in pakistan
| Updated on: Jul 13, 2025 | 7:57 PM

भारत-पाकिस्तानातील संघर्षानंतर पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. खैबर पख्तूनख्वाला हाताळणे पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना कठीण जात आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका पोलिस स्टेशनवर ड्रोन हल्ला केला. यात काही पोलिस जखमी झाले आहेत. गेल्या एका महिन्यात या पोलिस स्टेशनवर झालेला हा पाचवा हल्ला आहे. त्यामुळे लष्करी अधिकारी चिंतेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दहशतवाद्यांनी बन्नू जिल्ह्यातील मिर्यान पोलिस स्टेशनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यामुळे स्टेशनचे जास्त नुकसान झाले नाही. ड्रोन स्टेशनवर आदळण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न अपयशी झाला. त्यामुळे मोठे नुकसान टळले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अशांत भागातून दहशतवादी क्वाडकॉप्टर तंत्रज्ञानाचा वापर करुन हल्ला करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्करासमोर नवं आव्हान असल्याचे समोर आले आहे.

शोध मोहीम सुरू

या हल्ल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे, तसेच बन्नू जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मिर्यान पोलिस स्टेशनवर हल्ला होण्याच्या एक दिवस आधी, शुक्रवारी रात्री उशिरा लक्की मारवत जिल्ह्यातील सेराई गाम्बिला पोलिस स्टेशनवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता अशी माहितीही समोर आली आहे.

सेराई गाम्बिला पोलिस स्टेशनवर सुमारे डझनभर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या सर्वांनी पोलिस स्टेशनला वेढा घातला होता आणि अंदाधुंद गोळीबार केला होता, मात्र पोलिसांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी मिर्यान पोलिस स्टेशनवर हल्ला केला. मात्र या दोन्ही हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना फारसे यश आले नाही.

कोणतीही जीवितहानी नाही

सेराई गाम्बिला पोलिस स्टेशन पेशावर-कराची महामार्गावरील गाम्बिला नदीच्या काठावर आहे, या स्टेशनवर याआधीही अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता. गेल्या एका वर्षात खैबर पख्तूनख्वामध्ये रिमोट-कंट्रोल्ड ड्रोनमधून स्फोटके टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांसाठी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही बंदी असलेली दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.