China-Bangladesh : चीन एक दगडात मारणार दोन पक्षी, बांग्लादेशकडून बिझनेसही मिळवणार, भारताला झटकाही देणार
China-Bangladesh : बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान लवकरच चीन दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एक असा करार होणार आहे, ज्यामुळे भारताला अधिक सर्तक व्हाव लागणार आहे. पण त्याचवेळी चीन एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम करणार आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून चीन भारताला घेरण्याच्या रणनितीवर काम करत आहे. भारत विरोधी देशांना बळकट करण्यावर चीनचा भर राहिला आहे. पाकिस्तान, नेपाळ ही उदाहरणं आपल्यासमोर आहेतच. आता यामध्ये बांग्लादेशची भर पडली आहे. शेख हसीना यांची राजवट उलथवल्यानंतर आता बांग्लादेशातील नवीन सत्ताधारी पाकिस्तान आणि चीनच्या जास्त जवळ जाणारे आहेत. बांग्लादेशात आता तारिक रहमान यांच्या पक्षाची सत्ता आहे. ते पंतप्रधान आहेत. लवकरच तारिक रहमान चीन दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी चीनकडून 24 J-10CE मल्टीरोल फायटर विमानं खरेदी करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. तारिक रहमान यांच्या चीन दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये विविध करार होणार आहेत. त्यात चीनकडून फायटर जेट खरेदीचा मुद्दा देखील आहे. संरक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देश काम करत आहेत.
चीनकडून बांग्लादेश J-10CE मल्टीरोल फायटर विमानं खरेदी करणार ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण सध्याच्या घडीला भारतचं बांग्लादेशचा मुख्य विरोधक असल्याचं चित्र आहे. बांग्लादेशी माध्यमांनुसार ऑगस्ट महिन्यात फायटर विमानं खरेदीच्या मुद्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात फायटर विमानं खरेदी व्यवहाराच्या करारावर स्वाक्षरी होईल अशी आम्हाला आशा आहे, असं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
दोन्ही देशात किती करार होणार?
रिपोर्ट्नुसार प्रत्येक J-10CE ची किंमत 4 कोटी डॉलरच्या घरात आहे. हा करार लवकरात लवकर व्हावा यासाठी मागच्या आठवड्यात चिनी शिष्टमंडळ बांग्लादेश दौऱ्यावर गेलं होतं. प्रस्तावित करारातील काही महत्वाच्या बाबी निश्चित करण्यासाठी बांग्लादेशला चीनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक करायची आहे. बांग्लादेशच्या परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार तारिक रहमान यांच्या चीन दौऱ्यात 17 कागदपत्रांवर स्वाक्षर्या होतील. यात 15 MOU आहेत.
हा भारतासाठी धोक्याचा अलार्म
“चीन खूप जवळचा मित्र, रणनितीक भागीदार आणि बांग्लादेशचा महत्वाचा व्यावसायिक, विकासातला सहकारी आहे. सध्या दोन्ही देशातील संबंध सर्वसमावेशक रणनितीक सहकार्य भागीदारीच्या पातळीपर्यंत पोहोचले आहेत. परस्पर विश्वास, आदर आणि सहकार्य या बळावर ते अधिक विस्तारणार आणि भक्कम होणार आहेत” असं बांग्लादेशच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटलं आहे. लष्करी दृष्टया बांग्लादेश अधिक बळकट होणं आणि चीनला अनुकूल परराष्ट्र धोरण हा भारतासाठी धोक्याचा अलार्म आहे.