
Japan Earthquake : या पृथ्वीवर कधी काय होईल सांगता येत नाही. मानवाने उभ्या केलेल्या इमारती, रस्ते क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात. सगळं काही एका सेकंदात नष्ट होऊ शकतं. सध्या जपानमध्ये असंच काहीसं होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानमध्ये उत्तर-पूर्व भागात 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला आहे. या भूकंपामुळे जपानमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा भूकंप एवढा मोठा आहे की त्यामुळे आता समुद्रदेखील खवळला आहे. समुद्रात मोठी त्सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त जपानच नव्हे तर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे. भूकंपाचे केंद्र आओमोरी प्रांताच्या किनाऱ्यापासून 80 किमी दूर असून 50 किमी भूगर्भात हा भूकंप झाला आहे. या भूकंपानंतर जपानमध्ये सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या हवामान विभागानुसार भूकंप हा आओमोरी आणि होक्काईड भागात आला असून यामुळे जपानच्या उत्तर पूर्व सागरी किनाऱ्यावर 10 फूट उंचीची त्सुनामी येऊ शकते. या भूकंपात सध्यातरी जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
जपानमधील भूकंपानंतर पॅसेफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरनेही (PTWC) महत्त्वाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जपानमधील भूकंपामुळे जपान आणि रशियालाही त्सुनामीचा फटका बसू शकतो. यासह भूकंपाच्या केंद्रापासून साधारण 10 हजार किमी अंतरातील परिसरातही समुद्राच्या विध्वंसक लाटा निर्माण होऊ शकतात.
जपान हा जगातील सर्वाधिक भूकंप होणाऱ्या देशांमधील एक देश आहे. हा देश प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायरजवळ आहे. याच भागात भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. त्यामुळेच या भागात नेहमी भूकंपाचे धक्के बसतात. जपानमध्ये 2011 साली विनाशकारी भूकंप आणि त्सुनामी आली होती. या नैसर्गिक संकटात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या झालेल्या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. मात्र जपानमधील सर्व यंत्रणा सतर्क जाल्या आहेत.