Epstein Files : 16 एपस्टीन फाईल्स गायब, ट्रम्पचं नावच नाही; अमेरिकेचा न्याय विभाग लपवतोय काय ?

Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधितफाईल्स पोस्ट केल्याच्या 24 तासांच्या आत किमान 16 फाइल्स या अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाइटवरून गायब झाल्या आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि घिसलेन मॅक्सवेल यांच्यासोबत एपस्टाईनचा फोटो समाविष्ट आहे.

Epstein Files : 16 एपस्टीन फाईल्स गायब, ट्रम्पचं नावच नाही; अमेरिकेचा न्याय विभाग लपवतोय काय ?
अमेरिकेचा न्याय विभाग लपवतोय काय ?
| Updated on: Dec 21, 2025 | 9:28 AM

जगभरात सध्या एपस्टीन फाईल्समुळे (Epstein Files ) खळबळ उडाली असून त्यात अनेक प्रसिद्ध राजकारणी, नेते, सेलिब्रिटी यांच्या नावांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. त्यांचे अनेक फोटोही समोर आले असून अनेक देशांपर्यंत हादरे बसले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन, राजपूत्र, इतर देशांचे काही नेते यांच्यासह जगातील अनेक मान्यवरांसोबत तरुणींचे फोटो व्हायरल झाले, तर या मध्ये काही तरूणींचे रेट कार्ड, त्यांच्या अंगावर लिहीलेल्या ओळ याचे तपशीलही समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पण याच एपस्टीन फाइल्स प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या सार्वजनिक वेबसाइटवरून दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 महत्त्वाच्या फाइल्स अत्यंत गूढपणे गायब झाल्या आहेत. या फाइल्स पोस्ट करण्यात आल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच या फाइल्स वेबसाइटवरून हटवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गायब झालेल्या कागदपत्रांमध्ये एक फोटो असाही आहे, जो खळबळजनक ठरू शकतो. कारण तो फोटो अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, जेफ्री एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेल यांचा असल्याचे म्हटले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या फाइल्स न्याय विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या होत्या, पण शनिवारी त्या सर्वसामान्य लोकांना त्या पाहत्या आल्या नाहीत. यामध्ये अनेक विवस्त्र महिलांचे चित्रण करणाऱ्या कलाकृतींची छायाचित्रं आणि फर्निचरवर आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या अनेक छायाचित्रांचा कोलाज यांचा समावेश होता. मात्र आता त्या फाइल्स दिसत नाहीत. विशेष म्हणजे, या फायली जाणूनबुजून काढून टाकण्यात आल्या आहेत की काही तांत्रिक बिघाडामुळे त्या वेबसाइटवर दिसत नाहीत हे अमेरिकेच्या न्याय विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू असल्याचा संशय यातून व्यक्त होत आहे.

फाइल्स गायब झाल्याने सोशल मीडियावरही खळबळ

या फाईल्स अचानक गायब झाल्यामुळे सोशल मीडियावरही बऱ्याच अटकळी बांधल्या जात असून चर्चांना उधाण आलं आहे. जेफ्री एपस्टाईन आणि त्याच्या संबंधांबद्दल जनतेच्या मनात फार पूर्वीपासून रस आहे. मात्र आता यातील फाइल्स आणि ट्रम्प यांचा फोटो गायब झाल्याने खळबळ माजली असून हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरू अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “आणखी काय लपवलं जातंय ? अमेरिकन जनतेला पारदर्शकता हवी आहे” अशी मागणी त्यांनी केली आहे.

एपस्टाईनशी संबंधित हजारो पानांची कागदपत्रे अलीकडेच एका नवीन कायद्याअंतर्गत सार्वजनिक करण्यात आली तेव्हा हा वाद आणखी वाढला.मात्र, या कागदपत्रांमधून त्याच्या गुन्ह्यांबद्दल कोणतीही ठोस नवीन माहिती उघड झाली नाही किंवा वर्षानुवर्षे गंभीर आरोपांपासून त्याला कसे संरक्षण देण्यात आले होते हेही स्पष्ट झाले नाही. पीडितांच्या एफबीआय मुलाखती आणि अंतर्गत अभियोजन नोट्स यासारखी बहुप्रतिक्षित कागदपत्रं यांचा मात्र या फाइल्समध्ये समावेशच नव्हता.

यामुळे 2000 च्या दशकात जेफ्री एपस्टाईनच्या वादग्रस्त प्ली डील आणि संघीय एजन्सींच्या भूमिकेबद्दल पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, काही नवीन पैलू देखील समोर आले आहेत. हा खुलासा अपूर्ण आहे असं पीडित आणि डेमोक्रॅटिक सदस्यांचं म्हणणं आहे.