
अनकेदा उशिरा कार्यालयात आल्यामुळे कर्मचाऱ्याला शिक्षा केली जाते किंवा त्याला नोकरीतून काढले जाते. पण स्पेनमध्ये याच्या अगदी उलट एक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिची वेळेआधी कार्यालयात येण्याची सवय चांगलीच महागात पडली. वारंवार वरिष्ठांनी मनाई करूनही तिने ही सवय कायम ठेवली. त्यामुळे तिला निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कंपनीने नोकरीतून काढले. या प्रकरणात न्यायालयानेही कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी स्पेनमधील एका कंपनीत काम करत होती. तिची शिफ्ट सकाळी 7:30 वाजता सुरु व्हायची. पण ती दररोज साधारण 6:45 किंवा 7:00 वाजता कार्यालयात पोहोचत असे. तिच्या बॉसने तिला स्पष्टपणे सांगितले होते की तू कामावर लवकर येऊ नकोस. वेळेनुसारच काम सुरू कर. लवकर येऊन काम सुरु करु नको, अशा सूचना तिला देण्यात आल्या होत्या. याबद्दल अनेकदा तोंडी आणि लेखीही सांगण्यात आले होते.
मात्र तिने तिची ही सवय बदलली नाही. ती सातत्याने लवकरच येत होती. या सवयीला कंटाळून कंपनीने शेवटी तिला नोकरीवरुन काढून टाकले. त्या तरुणीला कंपनीतून काढून टाकताच तिने याविरुद्ध जाब विचारला. तसेच तिने याबद्दल कोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणीत कंपनीने याबद्दल स्पष्टीकरण दिले. आम्ही तिला वारंवार सूचना दिल्यानंतरही तिने हट्ट सोडला नाही. ती त्यानंतरही जवळपास १९ दिवस दररोज लवकर येत होती. काही वेळेस तिने ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही अटेंडन्स ॲपमध्ये लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला. असेही कंपनीने कोर्टाला सांगितले.
पण आमची मुख्य तक्रार तिच्या लवकर येण्याबद्दल नव्हती, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट आणि वारंवार दिलेले आदेश न पाळणे याबद्दल होती. एखाद कर्मचाऱ्याने वेळेपूर्वी येऊन अनावश्यकपणे कामात गोंधळ निर्माण करणे, हे टीमच्या शिस्तीसाठी हानिकारक होते. एका सहकर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ती लवकर येऊन कामात कोणतीही मदत करत नव्हती, उलट काम करण्याच्या ठरलेल्या सिस्टीममध्ये अडथळा निर्माण करत होती, असे कंपनीने म्हटले.
या नोकरी गमावलेल्या मुलीने कंपनीच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली. मात्र, कोर्टाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. कोर्टाने स्पष्ट केले की, बॉसचे आदेश पुन्हा-पुन्हा न मानणे, हा स्पॅनिश कामगार कायद्यानुसार (Article 54) गंभीर नियमभंग आहे. त्यामुळे कंपनीने तिला नोकरीतून काढण्याचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या अशा गंभीर चुकीसाठी कंपनीने कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची कारवाई योग्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोर्टाने तरुणीला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
कोर्टाच्या या निर्णयाने असंतुष्ट असलेल्या या तरुणीने आपण चुकीचे नसून कंपनीने आपला हेतू न समजता अन्याय केला आहे, अशी भूमिका घेतली आहे. तिने आता हा निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.