
Israel And Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. या युद्धात आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. तर इस्रायलमधील काही नागरिकांचाही यात मृत्यू झालेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हमासला समुळ नष्ट करण्यासाठी इस्रायकडून मोठी मोहीम राबवली जात आहेत. हमासनाही माघार न घेता इस्रायलशी दोन हात करत हल्ले केलेले आहेत. हेच युद्ध रोखण्यासाठी ट्रम्प एक नवा शांतता करार समोर आणला आहे. या कराराला इस्रायलने सहमती दाखवली आहे. त्यानंतर हमास नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता हमास या दहशतवादी संघटनेने शांतता करार मान्य करण्यासाठी काही अटी समोर ठेवल्या आहेत. या अटी समोर आल्यानंतर आता ट्रम्प यांच्यापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. कारण हमासने आपल्या मृत कमांडरचे मृतदेह मागितले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हमासने सध्या गझा पट्टीत सुरू असलेले युद्ध थांबवण्याची तयारी दाखवलेली आहे. मात्र त्याआधी हमासने इस्रायलपुढे काही अटी ठेवल्या आहेत. ही शस्त्रसंधी घडवून आणायची असेल तर आमच्या दोन कमांडरचे मृतदेह आम्हाला परत द्यावेत, अशी मागणी हमासने इस्रायलला केली आहे. इस्रायलने आपल्या कारवाईत हमासच्या या दोन कमांडर्सना ठार केले होते. या दोन्ही कमांडर्सची नावे याह्या आणि मोहम्मद सिनवार असे आहे. यासोबतच इस्रायलने कैदेत ठेवलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची तसेच हमासच्या काही दहशतवाद्यांची सुटका करावी, अशी मागणई केली आहे. इस्रायलने मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या शांतता प्रस्तावानुसार हमास इस्रायलच्या 40 कैद्यांची सुटका करेल. यातील 20 कैदी जिवंत आहेत तर उर्वरित कैद्यांचा मृत्यू झालेला असून त्यांचे मृतदेह इस्रायलला सोपवले जातील. या बदल्यात इस्रायलकडून 250 पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली जाईल. यातील बहुसंख्य कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. 7 ऑक्टोबर 2023 हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायले गाझा शहरावर हल्ला केला होता. यात 1700 लोकांना ताब्यात घेतले होते. या व्यतिरिक्त इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीत एकूण 60 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे.