
Hamas In Gaza : अमेरिकेच्या पुढाकारने इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबलेले आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका केली आहे. तर इस्रायलनेदेखील कैदेत ठेवलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना सोडून दिले आहे. दरम्यान, सध्या इस्रायल हमास यांच्यातील युद्ध थांबलेले असले तरी हमास संघटना मात्र अडचणीत सापडली आहे. हमासला आता गृहयुद्धाला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात आवाज उठवणारे कबिले सक्रिय झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलसोबतचे युद्ध थांबल्यानंतर आता हमासला गृहयुद्धाला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळेच गाझा पट्टीत हमास सक्रीय झाली आहे. हमास आपले अस्तित्व टिकवून टेवण्यासाठी तिथे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हमून गाझा सिटीत हमासने 8 पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केली आहे. या सर्वांनी इस्रायलसाठी हेरगिरी केली होती, असा आरोप हमासने केला होता. हमासने या आठ जणांची हत्या करतानाचा व्हिडीओदेखील तयार केला असून तो इंटरनेटवर शेअरही केला आहे. या हत्यांनंतर आता गाझामधील स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
द न्यूयॉर्क टाईम्सने हमासच्या या कृत्यांबाबत एक रिपोर्ट केला आहे. याच रिपोर्टनुसार इस्रायलसोबतच्या युद्धात गाझा पट्टीत मोठे नुकसान झाले असले तरी आम्हीच गाझामधील प्रमुख शक्तिशाली गट आहोत, असे हमासला यातून दाखवायचे आहे. कतारमध्ये असलेल्या पॅलेस्टिनी विश्लेषकतामेर कर्मौत यांनी हमासच्या या धोरणावर आपले मत व्यक्त केले आहे. “या हत्यांमधून हमासला एक संदेश द्यायचा आहे. आम्ही अजूनही गाझामध्ये आहोत, हे हमासला सांगायचे आहे. गाझामध्ये आमची सत्ता अजूनही कायम आहे, असे हमासला दाखवून द्यायचे आहे,” असे कर्मौत म्हणाले आहेत.
इस्रायलसोबतचे युद्ध थांबल्यानंतर आता गाझा पट्टातील इतर गट हमासवर हल्ला करत आहेत. सोमवारी (13 ऑक्टोबर) रोजी असाच संघर्ष समोर आला होता. यात हमासचे 10 तर विरोधी कबिल्याचे 20 जण मारले गेले होते. आता हमासचे सदस्य शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दिसत आहेत. त्यांना विरोध करणाऱ्या गटांच्या ठिकाणावर ते छापेमारी करत आहेत. नुकतेच त्यांनी दुगमुश कबिल्यावर हल्ला केला होता. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.