
War In Red Sea : सध्या मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळून जात आहे. भारत, पाकिस्तान यासारख्या देशांत तर मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु एकीकडे युद्धविरामासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा होत असताना आता दुसरीकडे हे युद्ध आणखी चिघळले आहे. कारण येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली आहेत. त्यामुळे आता होर्मुझच्या सामुद्रधुनी आता लाल समुद्राच्या मार्गातून होणारा व्यापारही संकटात सापडला आहे. परिणामी भविष्यात इंधनाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
इराणने अगोदरपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. या मार्गाने जगातील 20 टक्के तेलपुरवठा केला जातो. त्यानंतर आता हुथी बंडखोरांनी दक्षिण इस्रायलच्या अनेक महत्त्वपूर्ण लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलने मात्र आम्ही ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत, असे सांगितले आहे. परंतु हुथी बंडखोर थेट युद्धात उतरल्याने लाल समुद्रातील व्यापार संकटात आला आहे. इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हुथी बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी आम्ही अमेरिका आणि इस्रायलला इराणवर हल्ला करण्यासाठी लाल समुद्राचा वापर करू देणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात लाल समुद्रातही हल्ले, प्रतिहल्ले केले जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम व्यापारावर होऊ शकतो. ही शक्यता खरी ठरल्यास भविष्यात तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.
लाल समुद्रात बाब अल मंडेब हा जगातील सर्वात व्यग्र व्यापारी जलमार्गापैकी एक आहे. हा रस्ता सुएझ कालव्याला जोडलेला आहे. जगातील साधारण 12 टक्के जहाजे याच मार्गाने जातात. जर हा मार्गच बंद झाला तर या मालवाहू जहाजांना आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप या मार्गाने जावे लागेल. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढू शकतो. म्हणूनच भविष्यात लाल समुद्रात युद्ध पेटले तर तेलाची किंमत आणखी वाढू शकते.