इम्रान खान तुरुंगातून सुटणार? ‘या’ महत्वाच्या प्रकरणाची ११ जूनला सुनावणी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान हे जेलमधून सुटण्याची शक्यता आहे. ११ जूनला एका महत्वाच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

इम्रान खान तुरुंगातून सुटणार? या महत्वाच्या प्रकरणाची ११ जूनला सुनावणी
Imran Khan
| Updated on: Jun 08, 2025 | 11:02 PM

पाकिस्तानातून महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान हे जेलमधून सुटण्याची शक्यता आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी ११ जून रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या शिक्षेच्या निलंबनाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांच्याविरुद्ध अनेक फौजदारी खटले सुरू आहेत, त्यामुळे ते ऑगस्ट २०२३ पासून आदियाला तुरुंगात आहेत. अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हे सर्वात हाय-प्रोफाइल प्रकरणांपैकी एक आहे, ज्यामध्ये माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत, आता याच प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणावर बोलतान पीटीआयचे प्रख्यात वकील आणि नेते गौहर अली खान म्हणाले की, ‘११ जून हा पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीसाठी महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. या दिवशी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.’

अल-कादिर ट्रस्ट प्रकरण काय आहे?

अल-कादिर ट्रस्ट हे प्रकरण युनायटेड किंग्डमच्या नॅशनल क्राइम एजन्सी (एनसीए) ने प्रॉपर्टी टायकून मलिक रियाझ यांच्या कुटुंबाकडून १९० दशलक्ष पौंड जप्त केल्याशी संबंधित आहे. इम्रान खानच्या सरकारमध्ये असताना हे पैसे पाकिस्तानी राष्ट्रीय तिजोरीत जमा करण्याऐवजी ते मलिक रियाझ यांच्या कंपनी बहरिया टाउनच्या देणग्यांमध्ये सामील केली. याच्या बदल्यात, मलिक रियाझ यांनी कराचीच्या बाहेर शेकडो एकर जमीन अल-कादिर ट्रस्टला दान केल्याचा आपोप आहे.

या ट्रस्टचे विश्वस्त इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी आहेत. या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. सध्या एनएबी या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासाबाबत न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यांची सुनावणी आता ११ जून रोजी होणार आहे. यात इम्रान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इम्रान खान हे तुरुंगात असल्याने पक्षात फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलताना वकील गौहर अली खान यांनी पक्षातील अंतर्गत मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे आणि पक्षात एकता असल्याचा दावा केला आहे. तसेच आता सर्वांचे लक्ष ११ जून रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडे आहे असही गौहर अली खान यांनी म्हटले आहे.