
दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला आता त्याचीच मोठी किंमत चुकवावी लागतेय. त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपायचं नाव घेत नाहीय. एक समस्या संपली की दुसरी उभी राहतेय. एकाबाजूला पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सीजफायरवर एकमत झालय. दुसरीकडे आता नवीन संकट उभं राहिलय. पुन्हा एकदा बलूचिस्तानात पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झालाय. बलूचिस्तानच्या कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर घात लावून हल्ला करण्यात आला. यात दोन कमांडोसह सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मृतांमध्ये नायक तारिक, मुजम्मिल,फराज, आजम नवाज, लान्स नायक शाहजहां आणि अबशार यांचा मृत्यू झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्पेशल स्नायपर्सनी पाकिस्तानी सैन्यावर हा हल्ला केला. योजनाबद्ध पद्धतीने हा हल्ला झाल्याची माहिती आहे. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात झडपा सुरु आहेत. सर्व प्रवेशाचे आणि निघण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. BLA ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी स्नायपर आणि रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) सारख्या शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानी सैन्याच्या दोन वाहनांच सुद्धा मोठ नुकसान झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
50 मिनिटं गोळीबार
रिपोर्टनुसार, दोन्ही बाजूंमध्ये जवळपास 50 मिनिटं गोळीबार सुरु होता. हल्ल्याचं स्वरुप आणि लागलेला वेळ यावरुन स्पष्ट होतं की, पाकिस्तान विरोधात BLA अधिक संघटित आणि अत्याधुनिक हल्ले करत आहे.
पाकिस्तानी सैन्यावर अनेक घातक हल्ले
BLA एक जातीय राष्ट्रवादी बंडखोर संघटना आहे. बलूचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याची त्यांची मागणी आहे. पाकिस्तान सरकार बलूचिस्तानच आर्थिक शोषण आणि खराब अवस्थेसाठी जबाबदार आहे, असं ही संघटना मानते. मागच्या काही वर्षात या संघटनेने आपल्या घडामोडी वाढवल्या आहेत. सुरक्षा पथकं, सरकारी प्रतिष्ठा आणि खासकरुन चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या प्रोजेक्टसना BLA ने लक्ष्य केलय. बीएलएने मागच्या काही महिन्यात पाकिस्तानी सैन्यावर अनेक घातक हल्ले केले आहेत. कलात पाकिस्तानच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. बलूचिस्तानात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे.