
आपला शेजारील देश म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशातील गृहयुद्धाने घातक वळण घेतले आहे. सोमावारी जारी झालेल्या एका बातमीनुसार ब्रह्मदेशातील लष्करी राजवटीने ( जुंटा ) आता नागरिकांवर आणि सरकार विरोधी ताकदींवर आकाशा हल्ला करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पॅरामोटर आणि जायरोकाप्टर सारख्या कमी तांत्रिक फ्लाईंग मशीनींचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला आहे. यामुळे आकाशात अचानक गोळ्यांचा वर्षाव केला जात असून त्यात अनेक जण ठार होत आहे. या विषयी मानवी अधिकार संघटना ‘फोर्टिफाय राईट्स’ने सैन्य या मशीनद्वारे अक्षरश: मृत्यू बरसवत असल्याची टीका केली आहे.
सायलेंट किलींग पॅरामोटर वास्तविक एक पॅराग्लायडर असून याच्या मागच्या बाजूला एक प्रोपेलर लावलेला असतो. तर जायरोकाप्टर एक छोटे दोन आसनी विमान असते ज्यात हेलिकॉप्टरसारखे फिरणारे पंखे असतात.हल्ल्याच्या वेळी हे पॅरामोटर चालक नेहमी आपले इंजिन बंद करतात आणि लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर गुपचुप ग्लाईड करत खाली येतात. जमीनीवर आंदोलकांना याचा पत्ता लागण्याच्या आधीच बेसावध असलेल्या लोकांवर बॉम्बचा वर्षाव याद्वारे केला जात आहे. फोर्टिफाय राईट्सचे सदस्य चिट सेंग यांनी सांगितले की लष्कराने नागरिकांना ठार करण्यासाठी हा नवा आणि स्वस्तातला प्रकार शोधला आहे.
आतापर्यंत या यादवी युद्धात डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान नागरिकांवर पॅरामोटर आणि जायरोकाप्टरद्वारे ३०४ घातक हल्ले करण्यात आले आहेत. सर्वात घातक हल्ला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सगाईंग क्षेत्रात झाला होता. येथे एका पॅरामोटरने मेणबत्ती मोर्चा काढणाऱ्या जमावावर दोन बॉम्ब गोळे डागले. त्यात किमान २४ जण ठार झाले होते.
सगाईंग येथील एका हॉस्पिटलवर जायरोकाप्टरने हल्ला केला होता. त्यात मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि दोन अन्य स्टाफचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर ब्रह्मदेशात हिंसा सुरुच असून यात आतापर्यंत ७,७०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. मात्र, लष्कराने (तातमाडा) हा दावा नेहमीच नाकारला असून नागरिकांची दमनशाही सुरुच आहे.
या उपकरणांचा धोरणात्मक दृष्ट्या लष्कराला फायदा होत आहे. कारण ही यंत्रणा स्वस्त असून तिला चालवण्यासाठी जास्त प्रशिक्षणाची गरज नसते. ही स्वस्त उपकरणे कोणत्याही मोकळ्या मैदानातून उडवता येतात असे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे विश्लेषक मॉर्गन मायकेल्स यांनी म्हटले आहे.
विरोधी दलांकडे जेथे घातक शस्त्रे नाहीत त्या भागात या उपकरणाचा लष्कर सरार्स वापर करत आहे. यामुळे लष्कराला आता देशाच्या सीमावर्ती भागांचे रक्षण करण्यासाठी महागडे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर राखीव ठेवता येतात. चीन आणि रशियासारखे देश ब्रह्मदेशाला लष्करी उपकरणे पुरवित असताना, जगभरातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत. मात्र, पॅरामोटर्ससारख्या “दुहेरी वापराच्या” व्यावसायिक उपकरणांना आळा घालणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक मोठे आव्हान बनले आहे.