‘भारत कधीही हल्ला करू शकतो, आम्ही…’ पाकिस्तानच्या मंत्र्यानं घेतला धसका
भारत कधीही हल्ला करू शकतो, आम्ही आमचं सैन्य सज्ज केलं आहे, असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

जम्मू -काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र नेहमी प्रमाणे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय लष्कर आमच्यावर कधीही हल्ला करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं संरक्षण मंत्र्यांनी?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही आमच्या सेनेची मोर्चे बांधणी केली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. भारतीय सैनिक कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान भारतानं सिंधू नदीच्या जल वाटप कराराला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं विखारी वक्तव्य करण्यात येत आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. आमच्याकडे अण्ववस्त्र असून, ते आम्ही सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत, असं त्यांच्या रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं आहे.
देशभरात संतापाची लाट
गेल्या मंगळवारी पहलगामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. नाव विचारून त्यांनी गोळीबार केला. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. या घटनेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे.पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारतानं देखील पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे, त्याचा शोध घेतल्या जात आहे.
