पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान बस सेवेला भारताचा विरोध

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान बस सेवेला भारताचा विरोध

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीन यांच्यात सुरु होणाऱ्या बस सेवेला भारताने विरोध दर्शवला आहे. कारण, ही बस पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे, ज्याच्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहे. भारताच्या विरोधाबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं चीनने म्हटलं आहे. तर भारताचा विरोध अयोग्य असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या बस योजनेवर तीव्र आक्षेप घेत त्यावर टीका केली आहे.

पाकिस्तानमधील एक खाजगी परिवहन कंपनी लाहोर ते चीनमधील शिंजियांग प्रांतातील काश्गर या दरम्यान चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोर (सीपीईसी) अंतर्गत शनिवारी बस सेवा सुरु करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या चार दिवसीय चीन दौऱ्यापासून बस सेवेची सुरुवात होणार आहे.

भारताने पाकिस्तान आणि चीनमधील प्रस्तावित बस सेवेला विरोध दर्शवला आहे. भारताचा सीपीआयसीला विरोध आहे, कारण, हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील 1963 चा तथाकथित सामंजस्य करार अवैध आणि बेकायदेशीर असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.

हा करारच अवैध असल्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधून जाणारी कोणतीही बस सेवा भारताचं सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचं उल्लंघन असेल, असं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. भारताच्या विरोधाबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांना विचारण्यात आलं. बस सेवेबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं लू कांग यांनी सांगितलं.

“सीपीआयसीबाबत माझ्याकडे अनेक प्रश्न आले आहेत. ही पाकिस्तान आणि चीन यांच्यातील एक आर्थिक योजना आहे आणि यामध्ये कोणत्याही तिसऱ्या घटकाचा संबंध नाही. याचा क्षेत्रीय वादाशी संबंध येत नाही,” असं लू कांग यांनी सांगितलं. सीपीआयसी ही अशी योजना आहे, जी चीनमधील काश्गरपासून ते पाकिस्तानमधील ग्वादर बंदरापर्यंत जाणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI