India-US Relation : ‘या सगळ्या भारतीय वंशाच्या लोकांना…’ अमेरिकी पत्रकाराची भारतीयांबद्दल विषारी भाषा

India-US Relation : डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या भारत विरोधी भूमिका घेतली आहे. आधी त्यांनी 50 टक्क टॅरिफ लावला. त्यांचे अनेक निर्णय भारताविरोधात जाणारे आहेत. आता ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल टाकून एका अमेरिकी पत्रकाराने भारतीयांबद्दल विषारी भाषा वापरली आहे.

India-US Relation : या सगळ्या भारतीय वंशाच्या लोकांना... अमेरिकी पत्रकाराची भारतीयांबद्दल विषारी भाषा
American journalist matt Forney
| Updated on: Dec 27, 2025 | 11:22 AM

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांना विरोध वाढत चालला आहे. भारतीयांविरुद्ध वक्तव्य आणि धमक्या देण्याचा सिलसिला तिथे सुरु आहे. आता अमेरिकी पत्रकार आणि दक्षिणपंथी एक्टिविस्ट मॅट फॉर्नी यांनी, 2026 मध्ये भारतीय समुदायाचे लोक आणि हिंदू मंदिरांवर हल्ले होऊ शकतात असा इशारा दिला आहे. फॉर्नी एवढ्यावरच थांबला नाही. भारतीय वंशाच्या सर्व लोकांना अमेरिकेतून काढून टाकलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं. अमेरिकेत 2026 मध्ये भारतीय वंशाच्या लोकांबद्दलचा राग, द्वेष टोकाला पोहोचेल. भारतीय वंशाचे लोक, त्यांचे व्यवसाय, घर आणि मंदिरांवर हल्ले होतील असं मॅट फॉर्नी यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावरुन वाद झाल्यानंतर फॉर्नीने आपली पोस्ट डिलिट केली.

भारतीय-अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि देशात सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना भारतात पाठवून दिलं पाहिजे. भारतीयांना अमेरिकेतून डिपोर्ट केलं पाहिजे असं फॉर्नीने म्हटलं होतं. अमेरिकेत भारतीयांवर कृष्णवर्णीय नाही, तर आफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक-अमेरिकी आणि पाकिस्तानी वंशाचे लोक हल्ला करतील, असा फॉर्नीचा दावा आहे. “मिडिया अशी गुन्हेगारी कृत्य दाबण्याचा प्रयत्न करेल. या समस्येवर फक्त एकच उत्तर आहे, भारतीयांना इथून पाठवून द्या” असं फॉर्नीच म्हणणं आहे.

भारतीयांबद्दल त्यांचे विचार काय?

फॉर्नी दीर्घकाळापासून अमेरिकेत येणाऱ्या स्थालांतरितांना विरोध करत आहेत. भारतविरोधी टिप्पण्या ते करत असतात. त्यांना याच भारतीयांविरोधी वक्तव्यांमुळे नोकरीवरुन काढून टाकलं आहे. मॅट फॉर्नी हे अमेरिकी स्तंभलेखक आणि पत्रकार आहेत. त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट एक्स पाहिलं तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवणं आणि त्यांना काढून टाकण्याची मागणी करण्याचा जुना इतिहास दिसून येईल.अलीकडेच त्यांना अमेरिकी मिडिया संस्था द ब्लेज मधून काढून टाकलं. त्यांच्यावर H-1B व्हिसा कार्यक्रम आणि भारतीय विषयांवर रिपोर्टिंग करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं होतं.

कृती पटेल गोयल यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

फॉर्नी यांनी अलीकडेच भारतीय-अमेरिकी नागरिक कृती पटेल गोयल यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कृती पटेल गोयल यांची ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Etsy च्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. “आणखी एक अयोग्य भारतीयाने अमेरिकी कंपनीची कमान संभाळली. मी खात्रीने सांगतो की, प्रत्येक अमेरिकीला हटवून त्यांच्या जागी भारतीयाला आणणं हे त्यांचं पहिलं पाऊल असेल. या भारतीयांना परत पाठवून द्या” अशी आक्षेपार्ह टिप्पणी फॉर्नी यांनी केली.