मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात भारत ॲक्शन मोडमध्ये, जयशंकर यांनी इराणला सुनावलं

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावावर गंभीर चिंता व्यक्त केली. व्यापारी जहाजे आणि खलाशांना लक्ष्य करणे भारताला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही, अशा हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. संवाद आणि राजनैतिक मार्गांनीच समस्या सोडवण्यावर जयशंकर यांनी भर दिला.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात भारत ॲक्शन मोडमध्ये, जयशंकर यांनी इराणला सुनावलं
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
| Updated on: Aug 01, 2026 | 7:50 AM

मध्यपूर्वेतील संघर्ष, तेथील तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. तेथील परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळली नसून त्यामुळे जगाचं टेन्शन मात्र वाढलं आहे. याच दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबाबत भारताची गंभीर चिंता व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांवी अराघची यांना थेट सुनावलं. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजं आणि खलाशांना लक्ष्य केलं जाऊ नये, असं ठाम मत यावेळी जयशंकर यांनी माडंलं.

या चर्चेनंतर जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्टही केली. व्यापारी जहाजांवर कोणत्याही पक्षाकडून होणारे हल्ले भारतासाठी अस्वीकार्य असून अशा घटनांचा भारत ठामपणे निषेध करतो, असं त्यांनी स्पष्टपणे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, सध्याच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय आहे, याच पुनरुच्चार देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

काय लिहीलं जयशंकर यांनी ?

” आज संध्याकाळी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. या प्रदेशातील वाढत्या तणावाबाबत भारताची चिंता मी व्यक्त केली. व्यापारी जहाज आणि खलाशांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत टाळले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्यांचा भारत कठोर शब्दांत निषेध करतो,” असं जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

सध्याच्या परिस्थितीबाबत इराणची भूमिका स्पष्ट

अब्बास अराघची यांनी सध्याच्या घडामोडींविषयी इराणचा दृष्टिकोन तसेच प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांची माहिती दिल्याचं, जयशंकर यांनी नमूद केलं. भारताने नेहमीच संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं समर्थन केलं असून, सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगून शांततापूर्ण मार्ग स्वीकारावा, अशी भूमिका भारताने पुन्हा एकदा मांडली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ही चर्चा अशा वेळी झाली की, याच्या अवघ्या एक दिवस आधी जयशंकर यांनी ब्लॅक सी परिसरातील व्यापारी जहाजं आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांच्याशीही चिंता व्यक्त केली होती. वाढत्या प्रादेशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने व्यापारी सागरी वाहतूक सुरक्षित राहणे आणि शांततापूर्ण तोडगा निघणे आवश्यक असल्याचा आग्रह सातत्याने धरण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us