
Pakistan Vs Iran : पाकिस्तान हा असा देश आहे, जिथं दहशतवादाला पोसलं जातं. या देशात सीमावर्ती भागात अनेक दहशतवादी ठिकाणं आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. नंतर हेच दहशतवादी भारत, इराण, अफगाणिस्तान या शेजारील देशांवर हल्ले करत आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानच्या उपद्रवाला कंटाळून इराणने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानने त्यांच्या सीमेतील दहशतवादी कारवायांना थांबवावे, असे इराणने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. हा संदेश देण्यासाठी इराणच्या लष्करप्रमुखांनी थेट पाकिस्तानी लष्करप्रमुखाशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता या दोन्ही देशांतील संबंधांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
इराण आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत. मात्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा उपद्रव भारत, चीनसह या देशालाही भोगावा लागतोय. त्यामुळेच आता इराणने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. इराणी लष्कराचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद मौसवी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. आपल्या या संभाषणात मौसवी यांनी पाकिस्तानी सीमेतून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. इराण-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्याचेही त्यांनी मौसवी यांनी असीम मुनीर यांना सांगितले आहे. तसेच दहशतवादाला संपवण्यासाठी पाकिस्तानने इराणला सहकार्य करावे, असे आवाहनही मौसवी यांनी मुनीर यांना केले आहे.
दहशतवादाला संपवण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करण्यास तयार आहोत. त्यामुळे द्विपक्षीय सहकार्यकाच्या मदतीने दहशतवाद, दहशतवादी समूहांविरोधात कारवाई केली जाईल, अशी अपेक्षाही इराणने व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणमध्ये पाकिस्तानातील जैश-अल-अदल नावाच्या दहशतवादी संघटनेकडून हल्ले केले जातात. यावेळी इराणनने पाकिस्तानला खडसावले असले तरी पाकिस्तानच्या काही प्रयत्नांचे कौतुकही केले आहे. या प्रयत्नांचा विस्तार होणे गरजेचे आहे, सध्या ज्या कमतरता आहेत, चत्या दूर करायला हव्यात, अशी अपेक्षाही इराणने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी भूभागातून इराणमध्ये दहशतवादी हल्ले केले जातात. या हल्ल्यांमागे काही कट्टर सुन्नी दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. नुकतेच जुलै महिन्यात इराणमधील जाहदेन येथील न्यायालयावर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकूण सहा इराणी नागरिकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात इराणमध्ये पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी चाबाहार येथेही स्फोटाच्या काही घटना घडल्या. या सर्व हल्ल्यांमागे बलूच प्रांतातील दहशतवादी संघटनांचा हात आहे, असे म्हटले जाते.