
Iran-US War Peace Talk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले पाच दिवसांसाठी थांबवण्याची जाहीर केले. त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, इस्त्रायल आणि पाकिस्तानचे अधिकारी या दोन्ही देशांना इस्लामाबाद येथे एका टेबलवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत असतील. या युद्धात पाकिस्तान शांतीदूत ठरू पाहत आहेत. त्यामुळे अनेक राजकीय तज्ज्ञ आणि कुटनीतीज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. यामाध्यमातून जागतिक राजकारणात पाक स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कोण येणार इस्लामाबादमध्ये?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वांस, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि माजी सल्लागार आणि ट्रम्प यांचे जावाई जेयर्ड कुशनर हे नेते इस्लामाबादमध्ये येऊ शकतात. इराणकडून या बैठकीसाठी कोण येणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. तर इस्त्रायलचे अधिकारी, तुर्की आणि इजिप्तचे वरिष्ठ नेते लवकरच पाकिस्तानमध्ये येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध सुरू असताना पाकची कुटनीती चर्चेचा विषय ठरली आहे.
पाक शांतीदूत ठरणार?
या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पजेश्कियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी इराणला इस्लामाबाद येथे बैठकीस आमंत्रित केले. यापूर्वी सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वार्तालाप झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी सुद्धा इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात पुढील आठवड्यात शांतीवार्ता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर व्हाईट हाऊसने याविषयीची कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कॅरोलिन लेव्हिट यांनी हा संवेदनशील मुद्दा असून जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत त्यावर बोलण्यास नकार दिला. तर दुसरीकडे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाप यांनी हा या सर्व बातम्या खोट्या असल्याचा दावा केला. जागतिक बाजाराला प्रभावित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे पाकिस्तान शांतीदूत होण्यासाठी आतूर असल्याचे समोर आले आहे.