
इस्रायलने गेल्या महिन्यात इराणमध्ये अनेक प्रमुख लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केली होती. त्यावेळी खामेनी टार्गेटवर असल्याचे बोलले जात होते. इस्रायली एजंट त्यांच्या अगदी जवळ आल्याचा दावाही करण्यात आला होता. धोका पाहून खामेनी युद्धादरम्यान बंकरमध्ये शिफ्ट झाले.
इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. काट्झ रविवारी इस्रायली हवाई दलाच्या रॅमन हवाई तळावर पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या उपस्थितीत ते म्हणाले की, जर आपल्या देशाला इराणकडून धोका असेल तर खामेनी सुरक्षित राहणार नाहीत, आम्हीत्यांच्यापर्यंतही पोहोचू.
जून महिन्यात इस्रायल आणि इराणमध्ये 12 दिवस भीषण युद्ध झाले होते. यावेळी इस्रायलसातत्याने खामेनी यांना टार्गेट करत असल्याची चर्चा होती. इस्रायली एजंट त्यांच्या अगदी जवळ आल्याचा दावाही करण्यात आला होता. धोका पाहून खामेनी युद्धादरम्यान बंकरमध्ये शिफ्ट झाले.
आम्हाला धमकावू नका: काट्झ
काट्झ म्हणाले की, मी खामेनी यांना स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, जर तुम्ही इस्रायलला धमकावत राहिलात तर आमचा हात पुन्हा इराणपर्यंत पोहोचेल. यावेळी ते अधिक ताकदीने होईल आणि यावेळी आम्ही वैयक्तिकरित्या तुमच्यापर्यंत पोहोचू. अशावेळी आम्हाला धमकावू नका नाहीतर तुमचं खूप नुकसान होईल. ‘
काट्झ पुढे म्हणाले की, ऑपरेशन रायझिंग लायनदरम्यान आपल्या हवाई दलाने उत्तम काम केले. आम्ही इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांवर हल्ला करून या धमक्यांना तोंड दिले. इराणने आमच्याशी गल्लत केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा स्पष्ट संदेश आम्ही इराणला दिला आहे. तेहरानमधील राजवटीने हे समजून घेतले पाहिजे.
काट्झ इराणवर आक्रमक
इराण आणि खामेनी यांच्याबाबत काट्झ यांची भूमिका सातत्याने आक्रमक राहिली आहे. इराकचे माजी शासक सद्दाम हुसेन यांच्यासारखेच हाल होऊ शकतात, असे सांगत त्यांनी 17 जून रोजी खामेनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. 10 जुलै रोजी एका कार्यक्रमात बोलताना काट्झ म्हणाले, “आम्ही तेहरान ते इस्फहान ते तबरीझपर्यंत हल्ले केले आहेत.
अली खामेनी आणि इतर इराणी नेत्यांना हा थेट संदेश आहे की, जर इराणने ज्यू राष्ट्राच्या संयमाची परीक्षा घेतली तर हवाई दलाची विध्वंसक शक्ती काय असेल, असे काट्झ म्हणाले. इस्रायलचे नुकसान करणाऱ्या इराणी अधिकाऱ्यांना लपण्यासाठी जागा नाही, असेही ते म्हणाले. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.