Hamas Israel War : डोळ्यावर पट्टी लावली, अन् धाडधाड गोळ्या घातल्या, गाझा शहरातला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर!
इस्रायल आणि हमास यांच्यात टोकाचे युद्ध चालू आहे. गाझा पट्टीत रोज अनेकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

Israel Hamas War : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्रायल देश जास्तच आक्रमक झाला आहे. या देशाकडून गाझा सिटीवरील हल्ले तीव्र केले जात आहेत. दरम्यान, आता गाझा सिटीमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इथे हमास संघटनेच्या दहशतवाद्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना थेट गोळ्या घातल्या आहेत.
तिघेही पॅलेस्टिनी नागरिक
इस्रायलकडून गाझा शहरावर मोठे हल्ले केले जात आहेत. याच गाझा शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हमासच्या दहशतवाद्यांनी तीन लोकांना घेरल्याचे दिसत आहे. हे तिघेही पॅलेस्टिनी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांनाही हमासच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना तिथे आजूबाजूला काही लोकदेखील उस्पस्थित होते. बाजूला उभ्या असलेल्या लोकांकडून नारे दिले जात अल्याचे दिसत आहे.
हमासच्या दहशतवाद्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. तसेच त्या तिघांनाही गुडघ्यावर बसवलेले असून त्यांचे हात मागे बांधलेले आहेत. दुसरीकडे त्यांच्या आजूबाजूला हमासच्या दहशतवाद्यांच्या हातात शस्त्र असून ते इकडे-तिकडे फिरत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी चालू आहे. काही लोक या घटनेचा व्हिडीओ तयार करत आहेत. तर काही लोक नारेबाजी करताना दिसतायत.
तुम्हाला शिक्षेशिवाय पर्याय नव्हता
न्यूयॉर्क पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार हमासचा एक शस्त्रधारी दहशतवादी ओरडून हात बांधलेल्या तिघांनाही मृत्युदंड ठोठावण्यात आलेला असल्याचे सांगत आहे. त्यानंतर हात बांधलेल्या तिघांनाही ठार करण्यात आले आणि मृत पॅलेस्टिनी नागरिकांच्या अंगावर पैसे फेकण्यात आले. तुम्ही केलेल्या विश्वासघातामुळे तुम्हाला शिक्षेशिवाय पर्याय नव्हता. आम्हाला कठोर शिक्षेची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा पूर्ण झाली, असेही एक शस्त्रधारी दहशतवादी बोलत असल्याचे न्यूयॉर्क पोस्टने वृत्तात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाझा शहरातील शिफा रुग्णालयासमोर हा सर्व प्रकार घडला आहे.
#BREAKING #Hamas executes three Gazans accused of Israeli collaboration in #Gaza City, moments after UK, Canada, & Australia recognize #Palestine. Crowds cheer as the act, filmed live, starkly contrasts with Western peace efforts, what are your thoughts? #Israel pic.twitter.com/ygZEG1Pjfr
— Thepagetoday (@thepagetody) September 21, 2025
आतापर्यंत 65 हजार लोकांचा मृत्यू
हमासच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांनी ज्या पॅलेस्टिनी नागरिकांना गोळ्या घातल्या यातील एकाचे नाव यासर अबू शबाब असे होते. शबाब हा इस्रायलला पाठिंबा देणार प्रमुख सहकारी होता, असे म्हटले जाते. तो इस्रायलच्या एका कथित सशस्त्र गटाचे नेतृत्त्व करत होता. इस्रायलच्या नियंत्रणात असलेल्या राफामध्ये तो सक्रिय होता, असेही सांगितले जाते. हमासच्या दहशतवाद्यांनी याआधीही अशा कारवाया केलेल्या आहेत. मानवी मदत आणि आणि मदत म्हणून देण्यात आलेल्या साहित्याची लूट केल्याच्या आरोपाखाली 6 पॅलेस्टिनी नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार इस्रायलसोबतच्या युद्धात आतापर्यंत गाझामध्ये 65 हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे.
