
गाझा पट्टीतील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी एक शांतता योजना सादर केली आहे. इस्रायलने या योजनेला सहमती दर्शवली आहे. मात्र हमासने अद्यापपर्यंत याला कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी हमासला अनेकदा धमकीही दिली आहे. अशातच आता तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी दावा केला आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि हमासला शांतता योजना स्वीकारण्यास सांगा अशी विनंती केली. त्यामुळे आता ट्रम्प हे युद्ध थांबवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. तुर्कीने गाझामधील इस्रायली कब्जा आणि हल्ल्यांना विरोध केला आहे. तसेच इस्रायलशी व्यापार स्थगित केला आहे. गाझाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे तुर्की आणि हमासची जवळीक पाहता ट्रम्प यांनी एर्दोगान यांना विनंती केली आहे. मात्र आता हमास काय निर्णय घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे झालेल्या चर्चेत तुर्कीचे अधिकारी सहभागी झाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला शांतता प्रस्ताव स्वीकारण्यास राजी करा असं आवाहन केले आहे. तुर्की आता हमासच्या संपर्कात आहेत. हमास पॅलेस्टाईनच्या भविष्यासाठी काय आवश्यक आहे यावर भर देत आहे.’
तुर्कीचे गुप्तचर प्रमुख इब्राहिम कालिन हे देखील इजिप्तमधील आणि दोहामधील चर्चेत सहभागी झाले होते. एर्दोगान यांना या युद्धानंतर गाझामध्ये सैन्य पाठवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना एर्दोगान म्हणाले की, ‘या विषयावर गंभीरपणे चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मात्र सध्या आमचे प्राधान्य युद्धबंदी, मदत आणि गाझाची पुनर्बांधणी करण्यावर आहे.’