इस्रायलच्या डझनभर लोकांकडून पॅलेस्टाईनच्या गावावर हल्ला, इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव पुन्हा वाढला

| Updated on: Sep 30, 2021 | 3:59 PM

पश्चिम किनाऱ्यावरील इस्रायली वस्तीतील डझनभर रहिवाशांनी पॅलेस्टिनी गावावर हल्ला केला. या लोकांनी घरांवर आणि उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली.

इस्रायलच्या डझनभर लोकांकडून पॅलेस्टाईनच्या गावावर हल्ला, इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव पुन्हा वाढला
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात 14 सप्टेंबरपासून तणाव सुरू आहे.
Follow us on

जेरुसलेम: इस्रायल पॅलेस्टाईन वाद काही थांबायचं नाव घेत नाही. आधी हमास विरुद्ध इस्रायली सैन्य अशी लढाई होती, मात्र आता थेट एका इस्रायलच्या डझनभर रहिवाशांनी एका पॅलेस्टाईनच्या गावावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम किनाऱ्यावरील इस्रायली वस्तीतील डझनभर रहिवाशांनी पॅलेस्टिनी गावावर हल्ला केला. या लोकांनी घरांवर आणि उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली. या हल्ल्यात लहान मुलासह अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (israeli-palestine-conflict-israeli-settlers-attack-palestinian-village-toddler-wounded-gaza-strip )

इस्त्रायलच्या एका मानवाधिकार गटाने एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात मुखवटे घातलेले लोक दिसत आहेत. या लोकांनी काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केल्याचंही दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, यावेळी इस्त्रायली सैनिक घटनास्थळीच होते, पण त्यांनी जमावाला रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली दिसत नाहीत. घटनेनंतर माध्यमाने इस्रायली लष्कराला प्रश्न विचारले, पण इस्त्रायली लष्कराने या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला.

14 सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये तणाव

दरम्यान या प्रकरणी इस्त्रायली पोलिसांनी दोन पॅलेस्टिनींना आणि इस्रायली वस्तीतील रहिवाशाला अटक केली आहे. या 2 गटातील तणावाचं रुपांतर मोठ्या संघर्षात झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितले. तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात 14 सप्टेंबरपासून तणाव सुरू आहे. हमासवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील तणाव पुन्हा वाढला आहे. गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात 5 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यात एक 16 वर्षीय पॅलेस्टिनी तरुणही ठार झाला. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत दोन इस्रायली सैनिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. पॅलेस्टिनी संघटना हमासच्या कट्टरतावाद्यांना पकडण्यासाठी इस्रायलने हा हल्ला केला. हा हल्ला पश्चिम किनारपट्टीवरच्या एका दहशतवादी संघटनेवर करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. ज्यात सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे नुकसान करण्याचा हेतू नव्हता. पण, ते चुकीने झाल्याचंही इस्रायलने म्हटलं आहे.

हमासची इस्रायलला धमकी

हमासने इस्रायली हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, हमासने सांगितलं आहे की, पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूचा निश्चितपणे बदला घेतला जाईल. हमासचे प्रवक्ते फौजी बारहौम म्हणाले की, ‘हा हल्ला पश्चिम किनारा आणि जेरुसलेमच्या लोकांना इस्रायलच्या सैन्याशी शस्त्रास्त्रांशी लढण्याचा आणि शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी जागरुक करतो.

सध्याच्या वादाचे कारण काय?

पश्चिम किनारपट्टीबाबत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील हा वाद आजचा नाही, तर अनेक वर्षांचा आहे. 1967 च्या मध्य-पूर्वच्या युद्धात इस्रायलने वेस्ट बँक हा भाग ताब्यात घेतला. ताबा मिळाल्यानंतर इस्रायलने या भागात अनेक वस्त्या बांधल्या आहेत, ज्यात सध्या 5 लाख लोक राहतात. वेस्ट बँकमधील इस्रायली वस्त्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहेत. मात्र, इस्रायल हा दावा मानत नाही.

इस्रायलचा दावा आहे की, हे क्षेत्र धार्मिक आहे आणि ते त्यांच्या पूर्वजांचे आहे. पॅलेस्टाईनचा वेस्ट बँक हा भागही आपलाच आहे. तर दुसरीकडे, पॅलेस्टाईन वेस्ट बँकसह पूर्व जेरुसलेमवर दावा करतो, तर इस्रायल जेरुसलेमवरचा आपला दावा सोडण्यास तयार नाही.

हेही वाचा:

US-India Relationship: भारत-अमेरिकेचा शत्रू समान, लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर एकत्र या, अमेरिकन सिनेट सदस्याचं वक्तव्य

आपल्याच नागरिकांच्या विमानाच्या लँडिंगला अमेरिकेचा नकार, काबुलवरुन विमान अमेरिकेत, पण नागरिक अजूनही विमानतळावर!