
Iran Necular Plant : इराणचे सर्वात मोठे नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. ट्रम्प यांनी इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला करण्याची आणि ते नष्ट करण्याची धमकी दिली होती. त्यावर खोमेनी यांनी सणसणीत उत्तर दिले. अमेरिकेने अशीच दिवास्वप्न पाहावी असा चिमटा त्यांनी काढला. कोणताही करार हा धमकीने अथवा जबरदस्तीने होऊ शकत नाही असे खोमेनी यांनी ट्रम्प यांना सुनावले. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा एकदा वाद पेटल्याचे दिसून येते.
शांतता करार दबावाखाली?
यापूर्वी ट्रम्प यांनी गाझामध्ये इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध थांबवल्याचे जाहीर केले. इस्त्रायलच्या संसदेत त्यांनी वाश्गिंटन आणि तेहराण यांच्यात शांतता करार होण्यावर जोर दिला. त्यांनी दोन्ही देशात चर्चेची तयार दाखवली. पण खोमेनी यांनी हा प्रस्तावच फेटाळला. इराणचा अणु कार्यक्रम आम्ही नष्ट केला अशी टिमकी अमेरिका नेहमी वाजवते. चांगलंय, त्यांनी अशीच दिवास्वप्न पाहावी असा टोला खोमेनी यांनी लगावला. इराणचा अणुकार्यक्रम खंडित होवो अथवा तो वेगाने पुढे जावो, अमेरिकेने त्यात नाक खुपसू नये, असा इशारा खोमेनी यांनी दिला. पाश्चिमात्य देश विशेष करून अमेरिका, इराणवर अणू शस्त्र निर्मितीचा कथित आरोप सातत्याने करत आहे. पण इराण वारंवार आमचा अणू कार्यक्रम हा शांततेसाठी आणि केवळ ऊर्जा निर्मितीसाठी असल्याचा दावा करत आला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान गेल्या काही वर्षात 5 वेळा अणू कार्यक्रमाविषयी चर्चा झाली आहे. पण त्यात मोठं काही हाती लागलेलं नाही. जून महिन्यात अमेरिकेने 12 दिवस इराणवर हवाई हल्ले केले. या दरम्यान चर्चा पूर्णपणे बंद झाली होती. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे हा हल्लाबोल केला होता. त्यावेळी मध्य-पूर्वेत वातावरण तापले होते. अरब देशांनी मात्र या सर्व प्रकरणात मौन राहणेच पसंत केले. इराणने अणू कार्यक्रम थांबवावा यासाठी अमेरिकेचा कायम दबाव आहे. पण इराण अमेरिकेला दाद देत नसल्याने ट्रम्प यांचा तिळपापड झालेला आहे. आता अमेरिका पुन्हा इराणवर खरंच हल्लाबोल करेल का, याविषयी जगात चिंता लागलेली आहे. सध्या ट्रम्प हे मन मानेल तसेच निर्णय घेत असल्याने जगात अशांतता पसरली आहे. त्यांचे व्यापारी धोरणं अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. तर आपण जगातील 7 युद्ध थांबवल्याचा उलट दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत आहे.