
टीव्ही9 नेटवर्कने जर्मनीच्या स्टुटगार्ट येथे न्यूज9 ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीव्ही9 नेटवर्कच्या या समिटला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल टीव्ही9चे आभार मानतानाच या कार्यक्रमातून भारत आणि जर्मनीचे संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच उदय सामंत यांनी जर्मनीच्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रातील वातावरण आणि सुविधा गुंतवणुकीसाठी कशा पुरक आहेत, हे सुद्धा त्यांनी ठासून सांगितलं.
मी टीव्ही९ला धन्यवाद देतो आणि टीव्ही९चं कौतुक करतो. टीव्ही९च्या माध्यमातून जर्मन आणि भारताला एकत्र आणण्याचं काम करण्यात आलं आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारच्यावतीने टीव्ही9ला धन्यवाद देतो. आज महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून स्टुटगार्टला येतानाही मनापासून आनंद आहे. कारण आपली पार्टनरशीप पुन्हा एकदा मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत विकसित होत आहे. पाच ट्रिलियन इकॉनॉमी होण्यासाठी मोदींचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र हा इकॉनॉमी हब आहे. महाराष्ट्राचा जीडीपी वाढत आहे. देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. मोदींच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात विकास होत आहे. आमचं सरकार पायाभूत सुविधा वाढवत आहे. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, संभाजी नगरातील टाऊनशीप, 20 हजाराहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्र देशातील औद्योगिक प्रगतीचं नेतृत्व करत आहे, असं सामंत म्हणाले.
महाराष्ट्राने उद्योगाच्या विकासासाठी काही महत्त्वाची धोरणं लॉन्च केली आहेत. एक म्हणजे औद्योगिक धोरण, दुसरं म्हणजे मीडिया आणि मनोरंजन, तिसरी रेन्यूएबल एनर्जी, चौथी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, पाचवी एरोस्पेस आणि डिफेन्स पॉलिसी. महाराष्ट्राने जर्मनीच्या गुंतवणूकदारांना रेड कार्पेट अंथरले आहे. जर्मनीच्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात यावं असं आमचं आवाहन आहे. जर्मनीशी पार्टनरशीप करण्यासाठी आम्ही कटिब्ध आहोत, असं सांगतानाच भविष्यातही टीव्ही९च्या माध्यमातून जर्मनी आणि महाराष्ट्राचं नातं आहे त्यापेक्षा अधिक मजबूत होईल, अशी आशा बाळगतो.