
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला होता. त्यानंतर आता मेक्सिकोने आता भारतासह आशियातील अनेक देशांवर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. मेक्सिकोने ज्या देशांसोबत व्यापार करार नाही अशा देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 जानेवारी 2026 पासून कर लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतासह चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांवरही हा कर लादण्यात आला आहे. काही वस्तूंवर 50 टक्के कर असेल तर काहींवर 35 टक्के कर आकारला जाणार आहे. मेक्सिको हा विकसनशील देश, अमेरिकन कराचा या देशाला फटका बसलेला आहे. असं असलं तरी हा देश भारत आणि इतर विकसनशील देशांवर कर का लादत आहे? याचा फटका मेक्सिकोला बसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतासह आशियातील देशांवर कर लादताना मेक्सिको सरकारने म्हटले की, आशियाई देशांमधील वस्तूंमुळे देशांतर्गत उत्पादनांना नुकसान होत आहे. राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या नेतृत्वातील सरकारने म्हटले की, उत्पादन वाढविण्यासाठी आणि नोकऱ्या जपण्यासाठी या देशांवर कर लादणे आवश्यक आहे. या करामुळे मेक्सिकन सरकारला अंदाजे $3.7 अब्ज महसूल मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम तोटा भरून काढण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे.
भारताने 2024-25 मध्ये मेक्सिकोला 5.7 अब्ज डॉलर्सची निर्यात केली. हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या 1.3 टक्के आहे. यावरून असे जाणवते की, मेक्सिकोच्या करामुळे भारताच्या निर्यातीला फारसा फटका बसणार नाही. मात्र भारताची मेक्सिकोला होणारी निर्यात काही निवडक क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. कार आणि त्यांचे सुटे भाग मोठ्या प्रमाणात मेक्सिकोला निर्यात केले जातात. हा आकडा एकूण निर्यातीत 25% आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्राला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मेक्सिकोच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. यामुळे सप्लाय चैनला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेत मेक्सिको आणि कर लादलेल्या देशांमध्ये व्यापार तणाव वाढू शकतो. तसेच मेक्सिकोमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंची कमतरता जाणवल्यास महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. भारताकडून मेक्सिकोला अनेक वस्तूंचा पुरवल्या जातात, मात्र करामुळे भारताने निर्यात कमी केल्यास मेक्सिकोच्या व्यापार महसूलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मेक्सिकोला दर्जेदार उत्पादने मिळणार नाहीत. तसेच इतरही देशांनी निर्यात थांबवली तर मेक्सिकोला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.