नरेंद्र मोदींचा पुतीन यांना खास संदेश, मानवतेच्या हितासाठी… युक्रेन युद्धावर मोठं भाष्य!
Modi Putin Meeting : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)चे शिखर संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यात मोदींनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यावर भाष्य केले.

किर्गिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)चे शिखर संमेलन सुरू आहे. या संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेत युक्रेनमधील युद्ध संपवण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे सांगितले. मानवतेच्या हितासाठी या अंतहीन युद्धाचा आता अंत व्हायला हवा, असा संदेश मोदी यांनी दिला. तसेच भारताने रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रत्येक प्रयत्नाला पाठिंबा दिला आहे. सर्व प्रश्नांचा शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे ही मानवतेचीच गरज असल्याचेही मोदींना म्हटले आहे.
ही मानवतेचीच हाक…
पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी शांततापूर्ण मार्गाने सर्व मुद्द्यांचे निराकरण करणे ही मानवतेची हाक आहे, असे म्हटले. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे घेऊन जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारत आणि रशियामधील व्यापार आणि मैत्री नवनवीन उंची गाठत असल्याबद्दल मोदींकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मोदी आणि पुतीन यांच्या भेटीचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये दोन्ही नेते एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचीही घेतली भेट
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारताला आगामी काळात इराणसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढवायचा असून त्यामध्ये विविधता आणण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पश्चिम आशियातील संघर्षावर संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागरिक आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेवर भर
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदी यांनी या भागातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. सर्व प्रश्न संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून सोडवले जावेत, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियामध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मोदींनी म्हटले होते.