
येत्या १९ सप्टेंबरला नेपाळ त्यांचा संविधान दिन साजरा करत आहे. २०१५ मध्ये लागू झालेल्या नवीन संविधानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस नेपाळच्या लोकशाही संघर्षाचे प्रतीक आहे. आता याच दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी नेपाळच्या संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच नेपाळमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारत पूर्णपणे तुमच्यासोबत असेल, असे आश्वासनही मोदींनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती दिली. नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी शांतपणे चर्चा झाली. नुकतंच नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये ज्यांनी जीव गमावला, त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त केली. तसेच शांतता आणि स्थैर्य परत आणण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याला भारताचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यासोबतच मी त्यांना आणि नेपाळच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनासाठी शुभेच्छा दिल्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Had a warm conversation with Mrs. Sushila Karki, Prime Minister of the Interim Government of Nepal. Conveyed heartfelt condolences on the recent tragic loss of lives and reaffirmed India’s steadfast support for her efforts to restore peace and stability. Also, I extended warm…
— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2025
नेपाळमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘जेन-झेड’ (Gen-Z) तरुणांनी भ्रष्टाचार आणि सरकारी गैरव्यवहारांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत किमान ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना १० सप्टेंबर रोजी राजीनामा द्यावा लागला होता.
या संकटानंतर, नेपाळच्या राष्ट्रपतींनी १२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ दिली. त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. तरुण आंदोलनकर्त्यांनी डिस्कॉर्ड या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर केलेल्या अनौपचारिक मतदानातून त्यांची निवड झाली. त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि भ्रष्टाचार-विरोधी आहे. त्यामुळे त्या लोकप्रिय ठरल्या आहेत. आता येत्या मार्च २०२६ पर्यंत त्या काम करणार असून, त्यानंतर नव्या निवडणुका होतील, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
भारताने नेपाळच्या शांततेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयानेही नेपाळला सहकार्य करण्याचे संकेत दिले होते. पंतप्रधान मोदींनीही १३ सप्टेंबरला सुशीला कार्की यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. नेपाळ आपला संविधान दिवस १९ सप्टेंबर रोजी साजरा करतो, जो २०१५ मध्ये लागू झालेल्या नव्या संविधानाची आठवण देतो. हा दिवस नेपाळच्या लोकशाही संघर्षाचे प्रतीक आहे. यंदाच्या हिंसाचारानंतर हा दिवस शांतता आणि एकतेचा संदेश देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.