Nepal Flood : काळजात धस्सच होईल! मृतदेह सापडले नाहीत म्हणून चक्क बाहुलीचे अंत्यसंस्कार; चटका लावणारी घटना
Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या महाकाय पुरामध्ये आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच 4500 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जे लोक बेपत्ता आहेत त्यांचावर कुटुंबियांनी ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले ते पाहून धक्काच बसला आहे.

घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आप्तांचा पत्ता लागलेला नाही. पण आता त्या आप्तांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अखेरचा निरोप देण्यात येत आहे. नेपाळमध्ये असे विध्वंसाचे दृश्य आहे की अनेक कुटुंबांनी आपल्या त्या आप्तांचे अंतिम संस्कार सुरू केले आहेत, ज्यांचा पुरांनंतर काहीही पत्ता लागलेला नाही. एक आठवडापूर्वी आलेल्या भयंकर पुराने संपूर्ण गाव आणि घरे वाहून गेली होती. आता ज्यांच्या परत येण्याची आशा हळूहळू संपत चालली आहे, त्यांच्या कुटुंबांनी प्रतीकात्मक अंतिम संस्कार सुरू केले आहेत, जेणेकरून त्यांच्या आप्तांच्या आत्म्याला शांती मिळाली असे त्यांना वाटेल.
हातात त्यांचे पार्थिव शरीर नसले तरीही गवतापासून बनवलेल्या पुतळ्यांनाच पार्थिव शरीर मानले जात आहे आणि विधिविधानाने पशुपतीनाथ मंदिरात त्यांचे अंतिम संस्कार केले जात आहेत. दुसरीकडे जे मृतदेह सापडले आहेत आणि ज्यांच्या आप्तांचा पत्ता लागलेला नाही, त्यांना सरकार जेसीबीच्या मदतीने एका रांगेत पुरत आहे. त्यांचे सामूहिक अंतिम संस्कार होत आहेत.
डोळ्यात अश्रू, मनात वेदना… नेपाळचे हे दृश्य पाहवत नाही
नेपाळमध्ये आपत्कालीन पथकांना आतापर्यंत ११०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. तर सुमारे ४,५०० लोक बेपत्ता आहेत. २६ ऑगस्टला उंच भागातील ग्लेशियर तुटल्याने बर्फाळ पाणी, खडक आणि मलबा यांची विशाल लाट चीन-नेपाळ सीमेजवळच्या भागांत वेगाने खाली आली. या लाटेने प्रचंड विध्वंस घडवून आणला. अनेक दिवस रिलीफ कॅम्प आणि मोर्चरींमध्ये आप्तांना शोधल्यानंतर काही कुटुंबांनी आशा सोडून दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचे अंतिम संस्कार सुरू केले.
इतक्या मोठ्या आपत्तीनंतर एक आठवडा उलटला तरीही नेपाळी बचाव पथकांना आशा आहे की काही लोकांना जिवंत वाचवता येईल. विशेषतः भागात असलेल्या अनेक जलविद्युत प्रकल्पांच्या (हायड्रोपॉवर प्लांट्स) बोगद्यांत अडकलेल्या लोकांना वाचवण्याची आशा कायम आहे. आतापर्यंत या मलब्याने बंद झालेल्या बोगद्यांतून बचाव पथकांना फक्त मृतदेहच मिळाले आहेत. तरीही पथके मलबा काढण्यासाठी सतत खोदकाम करत आहेत, ड्रिलिंग करत आहेत आणि स्फोट करून मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आशा आहे की आत कोणी जिवंत व्यक्ती मिळू शकते.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले की, त्यांना अजूनही आशा आहे की बेपत्ता हजारो लोकांपैकी काही लोक जिवंत असू शकतात. त्यांनी एएफपीशी बोलताना सांगितले की चमत्कार घडतात. या वेळी मी पूर्णपणे आशा सोडू इच्छित नाही.
मृतदेहांचे सामूहिक दफन
नेपाळमधील मोर्चरींमध्ये जागा कमी पडत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना डीएनए तपासणीसाठी नमुने घेतल्यानंतर शेकडो अज्ञात मृतदेह पुरणे भाग पडले आहे. मोठे जेसीबी कामाला लागले आहेत. ते एका रांगेत मोठे खड्डे करत आहेत आणि मृतदेह एका रांगेतच पुरले जात आहेत.